रेशन दुकानातून दाळ, साखर,तेल हद्दपार; दिवाळी कशी साजरी करायची

50

 

सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी भंडारा-ऋग्वेद येवले

भंडारा : आजही लाखो कुटुंबे रेशनच्या दुकानातून धान्य नेत पोटापाण्याची सोय करीत असतात. त्यातच दिवाळीसारख्या सणात शासनाकडून वेळेवर स्वस्त धान्य उपलब्ध होईल, अशी लाभार्थींची इच्छा असते.मात्र, आता दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली असताना रेशन दुकानातून डाळ, साखर गायब झाली आहे. फक्त अंत्योदय योजनेच्या लाभार्थींना साखर देण्यात येत आहे. त्यामुळे दिवाळी आनंदात कशी साजरी करणार, असा सवाल लाभार्थींमध्ये उपस्थित होत आहे.

भंडारा जिल्ह्यात पावणेतीन लाखांपेक्षा जास्त शिधापत्रिकाधारकांची संख्या आहे. त्यात अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांची संख्या मोठी आहे. वेळेवर धान्य पुरवठा होत नसेल तर त्याचा उपयोग काय? असेही लाभार्थी बोलून दाखवीत आहेत.
भंडारा जिल्ह्यात विद्यमान स्थितीत सर्वच स्तरातील शिधापत्रिकाधारकांना तांदूळ व गव्हाचे वाटप केले जात आहे. मात्र, साखर प्रत्येकालाच मिळत नाही. फक्त अंत्योदय योजनेतील लाभार्थींना साखर दिली जात आहे. याकडे जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने लक्ष देण्याची गरज आहे. तर, दुसरीकडे शासन जे पुरवठा करेल तेच आम्ही लाभार्थींना देऊ, असे जिल्हा पुरवठा कार्यालयाचे म्हणणे आहे. तालुका पातळीवर अनेक तक्रारी असतानाही त्या सोडविल्या जात नाहीत. परिणामी स्वस्त धान्य दुकानदारांची अरेरावी कायम असते.

दिवाळी साजरी करायची कशी

वेळेवर धान्य मिळत असेल तर सण-उत्सव साजरे करण्याचा आनंद वेगळाच आहे. दिवाळीच्या तोंडावर रेशन दुकानातून डाळ, साखर मिळत नसेल तर करावे काय? असा मोठा प्रश्न आहे. बाहेर दुकानातून अन्य धान्य घेण्याची वेळ शासनाने येऊ देऊ नये.
दिवाळीसारखा सण तोंडावर असताना रेशन दुकानातून शासनामार्फत तेल, डाळ, साखर दिली पाहिजे. याव्यतिरिक्त ते वेळेवर उपलब्ध होत नाही. शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.