डॉक्टरांना त्रास दिल्यास सहन केले जाणार नाही : उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

 

प्रतिनिधी / निलेश आखाडे.

रत्नागिरी : जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा चांगल्या प्रकारे सेवा बजावत आहे. राजकीयदृष्ट्या दादागिरी करून डॉक्टर्सना त्रास देण्याचा प्रयत्न कोणी करणार असेल तर प्रशासनाला संबंधितांवर कारवाईचे अधिकार देण्यात आले असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. यानंतर त्यांनी महिला रुग्णालयातील कोव्हिड रुग्णालयाचा शुभारंभ फीत कापून केला. रविवारी उद्यमनगर येथील महिला रुग्णालयातील कोव्हिड रुग्णालयाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी इंदू जाखर, फिनोलेक्सचे व्यवस्थापक श्री.काकडे, अभिषेकसाळवी, तहसीलदार शशिकांत जाधव, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संघमित्रा फुले, डॉ.सुभाष चव्हाण आदी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी रुग्णालयातील कक्षांची पाहणी ना. सामंत, आमदार राजन साळवी यांनी केली. या रुग्णालयातील अतिदक्षता विभागासाठी सर्वसोयींनी युक्त असे दहा बेड हे फिनोलेक्स व मुकुल माधव फाऊंडेशनच्यावतीने देण्यात आले. तत्पूर्वी कोव्हीड रुग्णालयाचा ई-शुभारंभ करण्यात आला. यासाठी पालकमंत्री अँड. अनिल परब, खा. विनायक राऊत, जि.प.अध्यक्ष रोहन बने उपस्थित होते. या रुग्णालयाच्या उद्घाटनापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना ना. सामंत म्हणाले की, सद्य परिस्थितीमध्ये सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. ओणी येथे सुपर स्पेशालिस्टी रुग्णालयाची मागणी आ. राजन साळवी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचेही ना. सामंत यांनी यावेळी सांगितले.

*दखल न्यूज भारत*