शब्दांच्या पुष्पवृष्टीत रंगला ‘पाऊस’ प्रकाशन सोहळा.. — मराठीशी नातं जोडण्याचा स्तुत्य उपक्रम: आर जे मिलिंद पाटील..

0
94

स्नेहल चेपूरवार
संपादीका
महेजबीन सैय्यद
कार्यकारी संपादीका
नागपूर: मी रेडीओ क्षेत्रातील माणूस असल्याने मराठीशी माझं नातं,अतूट नातं आहे. या क्षेत्रात अनेकांना विविध संधी उपलब्ध असून मराठी साहित्य व साहित्यिकांनी रेडीओच्या माध्यमातून जगासमोर आपल्या मराठी भाषेचं प्रतिनिधित्व करावं यासाठी मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष संपादक राहुल पाटील यांनी ‘पाऊस’ हा डिजीटल अंकाचा अभिनव असा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेऊन यात अनेक दर्जेदार लिखाण करणा-या राज्यातील साहित्यिकांना सहभागी करून घेतले हे अभिनंदनीय असून मराठी भाषेशी नातं जोडण्याचा स्तुत्य उपक्रम असल्याचे आर जे मिलिंद पाटील म्हणाले.’ ते पाऊस’ डिजीटल विशेषांक प्रकाशन सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. प्रारंभी उत्सुकता मनात तग धरून होती की, कार्यक्रम कसा असेल, परंतु बहारदार व कल्पकतेने शीस्तबद्ध समारंभाचे सादरीकरण केले हे गौरवास्पद असून सर्व सहभागी कवींना घेऊन रेडीओसाठी विशेष असा नवा कार्यक्रम करण्याचा मानस असल्याचे मिलिंद पाटील म्हणाले.
मराठीचे शिलेदार प्रकाशनातर्फे ‘पाऊस’ या डिजीटल विशेषांकाचा प्रकाशन सोहळा दि ५ अॉगस्ट २०२० रोजी ‘श्रावणातील पाऊस’ या व्हाट्सप समूहात नवख्या व पारंपारिक पद्धतीने संपन्न झाला. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून आर जे मिलिंद पाटील, रेडीओ अॉरेंज नागपूर, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ बबन नाखले, मुख्य कार्यकारी सहसंपादक डॉ आशिष उजवणे व मुख्य संपादक राहुल पाटील उपस्थित होते.

मराठीचे शिलेदार संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मिलिंद यांनी डिजीटल विशेषांकाची इ पुस्तिका समूहात प्रसारण करून पाऊस विशेषांकाचे विधिवत प्रकाशन केले. डॉ बबन नाखले यांच्या हस्ते प्रसिद्ध कवयित्री छाया जावळे, सातारा यांच्या ‘काव्यदर्पण’ या कवितासंग्रहाचे अॉनलाईन प्रकाशन पार पडले. जावळे दांपत्यांचा या ठिकाणी प्रकाशनातर्फे सत्कार करण्यात आला.
पाऊस विशेषांकात सहभागी झालेल्या ५५ साहित्यिकांना मराठीचे शिलेदार समूहातर्फे ‘साहित्य सेवा सन्मान’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्राचे वाटप मुख्य सहप्रशासक अशोक लांडगे, अरविंद उरकुडे, वैशाली अंड्रस्कर, सविता पाटील ठाकरे, सुधा मेश्राम, हंसराज खोब्रागडे, संग्राम कुमठेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्य संपादक राहुल पाटील यांनी आपल्या प्रास्ताविक व मनोगतीय भाषणात पाऊस विशेषांकाची संकल्पना विशद करून लॉकडाऊन च्या सद्यास्थितीत मराठी भाषेची श्रीमंती जपण्यासाठी आपण भाषेशी कसे एकनिष्ठ राहू याबद्दल मार्गदर्शन केले. तर डॉ भभन नाखले यांनी अभिनव उपक्रमास शुभेच्छा दिल्यात. मुख्य कार्यकारी सहसंपादक डॉ आशिष उजवणे यांनी आपल्या मनोगतातून विशेषांक निर्मितीचा धावता आढावा मांडला. श्रावणातील पाऊस या समूहात शब्दांची पुष्पवृष्टी करत प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
या बहारदार सोहळ्याचे सुत्र संचालन प्रशासक परीक्षक व मुख्य सहसंपादक सौ. सविता पाटील ठाकरे यांनी केले तर आपल्या खास शैलीत वैशाली अंड्रस्कर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या प्रसंगी समूहात राज्यातील विविध भागातील कवी, कवयित्री, लेखक आवर्जून उपस्थित होते.