भेंडाळा येथे विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या…… ऐन सणाच्या दिवशी दु:खद घटनेमुळे गावात शोककळा

113

 

हर्ष साखरे उपसंपादक

झरी: एका विवाहित तरुणाने दस-याच्या दिवशी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुकुटबन येथून पाच कि.मी. अंतरावरील भेंडाळा या गावात ही घटना घडली. गणेश खरवडे (35) असे आत्महत्या करणा-या विवाहित तरुणाचे नाव आहे. त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या भेंडाळा येखील गणेश खरवडे (35) हा रहिवाशी होता. तो विवाहित होता. तो पत्नी, मुलं व आईसह राहायचा. गुरुवारी दिनांक 14 ऑक्टोबर रोजी रात्री तो घरी झोपला होता. मात्र आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास गणेशच्या कुटुंबीयांना गणेश गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. घरच्या कर्त्या पुरुषाने आत्महत्या केल्याचे दिसतात कुटुबीयांनी एकच टाहो फोडला.

घटनेची माहिती गावात वा-यासारखी पसरली. घटना माहिती होताच बघ्यांची एकच गर्दी उसळली. घटनेची माहिती मृतकाच्या आईने मुकुटबन पोलीस ठाण्याला दिली. सहायक फौजदार अनिल सकवान व जमादार दिलीप जाधव यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. मृतदेह झरी येथे शवविच्छेदना करिता पाठविण्यात आला आहे.

गणेशला दारू पिण्याची सवय असल्याची माहिती मिळत आहे. दारूच्या नशेतूनच त्याने रात्री गळफास घेतला असावा असा प्राथमिक अंदाज गावातील लोक व्यक्त करीत आहे. मृतकाच्या मागे आई पत्नी एक मुलगा व एक मुलगी आहे. ऐन दसरा सणाच्या दिवशी गावात आत्महत्येसारखी घटना घडल्याने गावात शोककळा पसरली आहे. पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात अनिल सकवान व दिलीप जाधव करीत आहे.