शरयु पगारे यांना मूलींची उत्कृष्ट पटनोंदणी पूरस्कार जाहीर

250

 

दिलीप अहिनवे
मुंबई महानगर प्रतिनिधी
‘दखल न्युज भारत’

मुलुंड, दि. १५ : बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने दरवर्षी इयत्ता पहिलीच्या मुलींची उत्कृष्ट पटनोंदणी करणाऱ्या शिक्षकांना पूरस्कार जाहीर केला जातो. प्रमाणपत्र, मानधन रु. १०० व सादिल रु. २५ असे पूरस्काराचे स्वरुप आहे. पहिलीत दाखल झालेल्या मूली दुसरी इयत्तेत टिकवून ठेवणाऱ्या शिक्षकांच्या कार्याची दखल घेतली जाते. सोमवार, दि. १८ ऑक्टो. रोजी दुपारी १ वा. जी. व्ही. स्किम शाळा सभागृहात यानिमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

मुलुंड ‘टी’ विभागातील इयत्ता पहिलीच्या मुलींची उत्कृष्ट पटनोंदणी करणाऱ्या शिक्षकांची यादी जाहीर करण्यात आली. मुलुंड कॅम्प मराठी शाळा क्र. २ च्या शरयु प्रवीणकुमार पगारे यांनी हा पूरस्कार पटकवला आहे. मुख्याध्यापक मनोज पवार, प्रशिक्षिका कल्पना कोलते, कल्पना गांगुर्डे व स्पेशल शिक्षक दिलीप अहिनवे, मंजुषा माने व अर्चना पवार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोरोना कालावधीत शाळा बंद परंतु शिक्षण सुरु होते. लॉकडाऊनमुळे मुलांसोबत संपर्काचे साधन केवळ मोबाईल होता. अनेक मुलांकडे साधे मोबाईल होते. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत त्या मुलांपर्यंत विविध मार्गांनी संपर्क साधत होत्या. तोंडाला मास्क लावून व सामाजिक अंतर ठेवून मुलांच्या घराजवळ पोहोचल्या. विद्यार्थी व पालकांसोबत संवाद साधला. त्यांच्या समस्या समजावून घेतल्या व त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. याकामी मुख्याध्यापक मनोज पवार व इतर शिक्षकांचे सहकार्य घेतले. स्वभावाने धाडसी वृत्तीच्या शिक्षिका म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. शालेय कामात नेहमीच अग्रेसर असतात. मराठी माध्यमाच्या शाळेत उत्तम अध्यापन करतात, परंतु इंग्रजी भाषेवर देखील जबरदस्त पकड आहे. पालकांसोबत संवाद साधण्याची कला त्यांना अवगत आहे. शाळेतील कोणतीही समस्या सोडविण्यासाठी त्या सक्षम आहेत. ३१ वर्षांच्या मनपा सेवेत अनेक छोट्या मोठ्या पूरस्कारांवर त्यांनी आपले नाव कोरले आहे. अध्यापन कलेत निपुण असणाऱ्या या शिक्षिका १ डिसेंबरला सेवानिवृत्त होत आहेत.