‘कोरोनाला बाय-बाय’ करून पुनश्च हरिओम करा; शिवसेना उपनेते विनोद घोसाळकरांच आवाहन !

190

 

पंडित मोहिते-पाटील
उपसंपादक
‘दखल न्युज भारत’

मुंबई, दि.९ : ‘कोरोनाला बाय-बाय’ करून पुनश्च हरिओम करू या असे आवाहन शिवसेना उपनेते,म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांनी केले. दहिसर स्पोर्टस् फाऊंडेशनतर्फे महाराष्ट्रासह, मुंबई ‘कोरोना’मुक्त करण्यासाठी अथक प्रयत्नांची शिकस्त करणाऱ्या ‘कोरोना योद्धा’चा एका ध्वनिचित्रगीताद्वारे सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना घोसाळकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सर्व सहकारी, डॉक्टर, पालिका, पोलीस प्रशासनाने ज्या निर्धाराने ‘कोरोना’चा मुकाबला केला ते खरंच अभिमानास्पद असल्याचे सांगितले. पूर्वसंध्येचा दिवस ऐतिहासिक असून दि. ९ ऑगस्ट रोजी ज्याप्रमाणे इंग्रजांविरुद्ध चलेजाव चळवळ सुरू झाली, त्याप्रमाणेच आपण सर्वांनी मिळून आजपासून ‘कोरोना बाय बाय’, ‘कोरोना’ चलेजावची चळवळ सुरु करु या असेही त्यांनी सांगितले. तर ‘कोरोना’च्या संकटात शिवसैनिकांनी वस्त्या-वस्त्यांमध्ये जाऊन थर्मल गन, प्लस ऑक्सिमिटरच्या साह्याने तपासणी सुरू केल्याने आज मुंबईसारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या शहरात ‘कोरोना’ला आळा बसल्याचे शिवसेना विभागप्रमुख, आमदार विलास पोतनीस यांनी सांगितले.

‘कोरोना’च्या या महामारीत सर्वच व्यवसाय ठप्प झाले असताना ‘कोरोना बाय-बाय’ या गीतामुळे सर्वांनाच एक आशेचा किरण दिसू लागल्याचे सुप्रसिद्ध गायक, संगीतकार अवधूत गुप्ते यांनी सांगितले. तर उत्तर मुंबई म्हणजे शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर असे समीकरण असून लहानपणापासून त्यांचे कार्य जवळून पाहत आल्याचे गुप्ते यांनी सांगितले. आज त्यांच्या बरोबरीने त्यांचे चिरंजीव अभिषेक घोसाळकर देखील विभागात धडाडीने काम करत असून त्याची पोचपावती इतरांकडून ऐकल्याने समाधान मिळते. घोसाळकर यांनी हाती घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून आपल्या शुभेच्छा असल्याचे गुप्ते यांनी यावेळी सांगितले. तर लॉकडाऊनच्या कालावधीत गायक, गीतकार, संगीतकार तसेच सर्व वाद्यवृंद व्यवसाय ठप्प झाले असतानाच ‘कोरोना बाय-बाय’ या गाण्याची संकल्पना सुचल्याचे मोहन सामंत यांनी सांगितले. घोसाळकर यांनी हे गीत ऐकताच तात्काळ एक आगळा-वेगळा कार्यक्रम घेण्याचे ठरवले. त्यामुळे शासकीय नियमाचे पालन करत शनिवार दि. ८ ऑगस्ट ला एक सुंदर कार्यक्रम संपन्न झाल्याचे गीताचे कवी मोहन सामंत यांनी सांगितले. ‘कोरोना योध्दा’चा सन्मान केला जाणाऱ्या ‘कोरोना बाय-बाय’ या ध्वनिचित्रगीताचे यावेळी घोसाळकर यांच्याहस्ते यू ट्यूबवर प्रकाशन करण्यात आले . राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि प्रत्यक्ष ‘कोरोना’ युद्धात पराक्रम गाजवणाऱ्या ‘योद्धयांचा’ या गाण्यात गौरव करण्यात आला आहे. नागरिकांनी ‘कोरोना’ला न घाबरता सुरक्षिततेचे नियम पाळून पुनश्च हरिओम करण्याचा संदेश यामध्ये देण्यात आला आहे. राज्यभरात विशेषतः मुंबईमध्ये ‘कोरोना’ला आता आळा बसला आहे. या यशाच्या शिल्पकारांचा या गीतात सन्मान करण्यात आला आहे. ‘कोरोना बाय-बाय’ या ध्वनिचित्रगीताचे कवी मोहन सामंत, संगीतकार दत्ता थिटे असून प्रस्तुती दीपा सामंत यांची आहे.

याप्रसंगी सुजाता शिंगाडे (महिला विभागसंघटक), अभिषेक घोसाळकर (माजी नगरसेवक, मुंबै बँक संचालक), उपविभागप्रमुख भालचंद्र म्हात्रे, बाळकृष्ण ढमाले उपस्थित होते. विद्यामंदिर बँक्वेट हॉल, छत्रपती शिवाजी रोड, दहिसर (पूर्व), येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात शासकीय नियमानुसार मर्यादित श्रोते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन निमंत्रक दहिसर स्पोर्टस् फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष डॉ.अशोक मुळगावकर यांनी केले.