माणसं अशी कां वागतात?

254

 

संकलन
पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत

एकाची निंदा, दुसऱ्यापाशी करतात।
नको तेंव्हा, नको तेथे, नाही ते बोलतात, गोड-धोड दिसलं की,
नको तेवढं खातात।
माणसं अशी कां वागतात?

आवडली मुलगी म्हणून,
“लग्न” करतात।
थोडे दिवस गेलें की,
कुरापती काढतात।
जमत नाही घरी म्हणून,
“घटस्फोट” मागतात।
माणसं अशी कां वागतात?

दारूच्या नादाने व्यसनाधीन होतात। सोन्या सारख्या संसाराचे वाटोळे करतात।
पत्नी असली सुंदर, तरी बाहेर लफडी करतात।।
माणसं अशी कां वागतात?

थोरांच्या पुण्याईने,
भले झाले म्हणतात।
आई वडील असले कीं,
रागराग करतात।
मृत्यूनंतर त्यांच्या, सारे सोपस्कार करतात ।।
माणसं अशी कां वागतात?

नातेवाईकांची अधी-मधी विचार पूस करतात। चांगले चालले असले कीं, मनातून जळतात।
मात्र “ऐकून बरे वाटले” वर वर म्हणतात।।
माणसं अशी कां वागतात?

पाहुणा कोणी आला कीं, “या बसा” म्हणतात। ‘काय काम काढलं’ म्हणून हळूच विचारतात। येण्याच्या आनंदापेक्षा – जाण्याची
वाट पहातात।।
माणसं अशी कां वागतात?

दुसऱ्याच्या मदतीची अपेक्षा करतात ।
इतरांच्या कामी यावे – नेहमीच सांगतात।
कुणी कांही मागितलं कीं, असून नाहीं म्हणतात ।।
माणसं अशी कां वागतात?

कुठलाही माल उधारीने मागतात ।
चार दिवसांत “पैसे आणून देतो” म्हणतात ।
एकदा घेऊन गेलें कीं तोंड काळे करतात ।।
माणसं अशी कां वागतात?

गया वया करून, पैसे उसने मागतात।
वेळेवर परत देण्याचा ” वायदा ” करतात।
एकदा काम झालें कीं, विसरून जातात।।
माणसं अशी कां वागतात?

– समक्ष भेटीत, खूप गोड बोलतात ।
नेहमीच आठवण येते,
“वर वर म्हणतात “।
पत्र, अथवा फोनचा, खर्च मात्र टाळतात ।।
माणसं अशी कां वागतात?

कुणी कधी विचारलं तर, घेत नाहीं म्हणतात। फुकटची मिळाली की, भरपूर पितात।
जेवायचं असलं तरी, भूख नाहीं म्हणतात।।
माणसं अशी कां वागतात?

माणूस कोणी मेला कीं, “गळा” काढून रडतात। गोडवे त्याच्या मोठे पणाचे, तोंड भरून गातात।
मात्र त्याच्या हयातीत, नेहमी शिव्या घालतात ।।
माणसं अशी कां वागतात?

– अशा माणसाला कधीच गमावू नका ज्याच्या मनात, तुमच्याविषयी आदर काळजी आणि ‍प्रेम आहे. भले तो तुमच्या रक्ताच्या नात्याचा नसेल.
रक्त गट कुठलाही असो ,धर्म कोणताही असो, रक्तात फक्त माणुसकी असली पाहिजे

कवी – दिनेश बनकर
युवा पत्रकार
काव्य पुरस्कार प्राप्त, कवी