गडचिरोली जिल्हयात गेल्या 24 तासात 50 जण कोरोनामुक्त सक्रिय कोरोना बाधित राहिले 151 आज नवीन 18 रूग्णांची नोंद

 

कार्यकारी संपादिका रोशनी बैस

गडचिरोली : जिल्हयातील एकूण सक्रिय कोरोना बाधितांमधील काल सायंकाळी उशिरा 42 तर आज 8 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. त्यामुळे मागील 24 तासात एकूण 50 जणांना दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला. यामूळे जिल्हयातील एकूण कोरोनामूक्त रूग्णांची संख्या 560 झाली. कोरोनामूक्त झालेल्या 50 रूग्णांमध्ये जिल्हा पोलीस दलातील 36 जण, 5 जिल्हा सामान्य रूग्णालयातील कर्मचा-यासह इतर रूग्ण, आंबेडकरनगर देसाईगंज येथील 5 जण, आरमोरी येथील 2 व धानोरा तसेच मूलचेरा येथील एक-एक रूग्णाचा समावेश आहे.

आज नवीन 18 रूग्णांची नोंद : अहेरी तालुक्यात 17 तर मूलचेरा येथे 1 अशा 18 नवीन कोरोना बाधितांची नोंद आज जिल्हयात झाली. यामध्ये अहेरी तालुक्यातील कोरोना बाधित सुरक्षा जवानांच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. गेल्या आठवडयात बाधित आढळल्यानंतर त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांची तपासणी केली असता त्यातील 17 जण कोरोना बाधित आढळून आले. तर मूलचेरा येथील संस्थात्मक विलगीकरणातील 1 जण कोरोना बाधित आढळून आला.

जिल्हयातील एकूण बाधितांची संख्या 712 झाली तर सद्या त्यापैकी सक्रिय रूग्ण 151 उरले. आत्तापर्यंत 560 कोरोना बाधितांनी कोरोना विषाणूवर यशस्वी मात केली आहे.