कोव्हीड रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी “तारीख पे तारीख”, “अजब सरकार गजब कारभार” – अॅड.दीपक पटवर्धन

 

प्रतिनिधी निलेश आखाडे.

रत्नागिरी :- महिला रुग्णालय १०० बेडचे कोव्हीड रुग्णालयात रुपांतरीत होऊन रुग्ण सेवेसाठी उपलब्ध होणार ह्या बातम्या गेले अनेक दिवस ऐकतोय.पण तारीख पे तारीख एवढंच होतंय अशी खोचक प्रतिक्रिया देत आपली नाराजी अॅड.दीपक पटवर्धन भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी व्यक्त केली.
आज रुग्णालय रुग्ण सेवेसाठी सुरु होणार असे वृत्त होते.मात्र पालकमंत्री महोदय मिटिंग मध्ये व्यस्त असल्याने आज उद्घाटन होत नाही असे वृत्त वाचून उद्वेग झाला. रत्नागिरीत आरोग्य व्यवस्था धारातीर्थी पडली आहे. दोन प्रतिथयश डॉक्टर आपण गमावले. यामुळे जनतेत भीतीचे वातावरण आहे. जिल्हा रुग्णालयात अपुरा स्टाफ असल्याने त्यांच्यावर ताण आहे. त्यात मधेच औषधांची कमतरता असल्याची वृत्ते, तेथील व्हेंटिलेटर्सच्या क्वॉलिटीबाबत प्रश्नचिन्ह, असुरळीत वीज पुरवठा याबाबत वृत्ते येतात आणि त्यामुळे रुग्णांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये तांत्रिक त्रुटी असल्याबाबत वृत्त पसरतात. अशी संशय निर्माण करणारी स्थिती, रोज वाढणारे रुग्ण, जिल्ह्यात फक्त एक रुग्णालय, जेथे व्हेंटिलेटर्सची, ऑक्सिजनची सोय आहे.अशी स्थिती असतांना नवी आरोग्य सुविधा सुरु करतांना उद्घाटन कोणाच्या हस्ते यासाठी उद्घाटन कार्यक्रम पुढे ढकलला जातो ही रत्नागिरीकरांची चेष्टा आहे. आता त्या रुग्णालयाचे काम अपूर्ण असल्याने पालकमंत्री महोदयांचे नाव पुढे करून काही लपवाछपवी चालली आहे का ? असा प्रश्न पडतो, नव्हे तशी चर्चा चालू आहे. आरोग्य सुविधा सुधारा उद्घाटनाचे थाट नको, जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे. तात्काळ नवे हॉस्पिटल परिपूर्ण करून सुरु करा. अन्यथा आता जनआंदोलन उभारावे लागेल असा ईशारा अॅड.दीपक पटवर्धन यांनी दिला.