कृषी पंपाला बारा तास वीज देण्याचे नियोजन करा : पालकमंत्री सुनील केदार

0
67

 

प्रतिनिधी
बिंबिसार शाहारे/ राहुल उके

भंडारा : टाळेबंदी काळातही शेतकऱ्यांनी मोठया कष्टाने धान रोवणी केली असून पावसाच्या अनियमिततेमुळे धान जिवंत ठेवण्यासाठी कृषी पंपांना बारा तास वीज देण्याचे नियोजन करण्याच्या सुचना पालकमंत्री सुनील केदार यांनी वीज विभागाला दिल्या. या विषयी पालकमंत्र्यांनी महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक असिम गुप्ता यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा केली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज विविध विषयांचा आढावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
भंडारा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर गोडाऊन बांधकाम, पिक कर्ज वाटप व कृषी पंप विज जोडणीचा आढावा पालकमंत्र्यांनी या बैठकीत घेतला. आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी एम.जे. प्रदिपचंद्रन, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, उपविभागीय अधिकारी संदिप भस्के, जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड, जिल्हा पणन अधिकारी चंद्रकांत खाडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण, महावितरणचे अधिक्षक अभियंता राजेश नाईक व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना बारा तास विज उपलब्ध झाल्यास धानाचे पिक हातचे जाणार नाही असे नमुद करून पालकमंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी हा काळ अतिशय महत्वाचा असून पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला बारा तास विज पूरवठा आवश्यक आहे, यासाठीचे नियोजन महावितरणने तातडीने करावे अशा सूचना त्यांनी महावितरणाला दिल्या.
धान उत्पादक जिल्हा असलेल्या भंडारा जिल्हयात गोडाऊनची कमी असून मोठया प्रमाणात गोडाऊन उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना धान साठविणे सोईचे होईल. यासाठी बाजार समितीच्या गोडाऊनची दुरूस्ती करण्याचा प्रस्ताव पणन महासंघाकडे पाठविण्यात यावा. गोडाऊन बांधण्यासाठी शासकीय जमिनीचा शोध घेऊन प्रस्ताव तयार करण्यात यावा तसेच सेवा सहकारी सोसायटीजवळ असलेल्या जागेवर गोडाऊन बांधकामाचे नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. जिल्हयात शासकीय जागा उपलब्ध झाल्यास वखार महामंडळ गोडाऊन बांधण्यास ईच्छूक असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. सर्व बाजार समित्यांच्या ठिकाणी वखार महामंडळास गोडाऊनसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा उपनिबंधक यांनी अहवाल तयार करावा असे ते म्हणाले. पुढील हंगामात जिल्हयातील धान भरडाईसाठी अन्य जिल्हयात जाता कामा नये असे ते म्हणाले.
या बैठकीत पिक कर्ज वाटपाचा आढावा घेण्यात आला. खरीप हंगाम 2020-21 साठी जिल्हयाला 426 कोटी 25 लाखाचे पिक कर्ज वितरणाचे उदिष्ट होते. 6 ऑगस्ट 2020 अखेर जिल्हा सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँका व खाजगी बँकांनी 82 हजार 878 खातेदारांना 411 कोटी 60 लाखाचे पिक कर्ज वितरण केले. पिक कर्ज वितरणाची टक्केवारी 97 टक्के आहे. भंडारा जिल्हा मध्यवती सहकारी बँकेने 115 टक्के पिक कर्ज वितरण केल्याबद्दल पालकमंत्र्यांनी बँकेचे कौतुक केले. राष्ट्रीयकृत बँकेने आपले उद्दीष्ट 17 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या. प्रधानमंत्री पिक विमा योजना, खते व बियाणे आदी विषयांचा आढावा यावेळी घेण्यात आला.
जिल्हयातील धानाच्या प्रत्यक्ष उत्पन्नाबाबत कृषी, महसून व जिल्हा परिषद कृषी विभागाच्या समिती मार्फत सर्वेक्षण करून उत्पन्न निश्चित करावे, असे पालकमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांनी पिक पद्धतीत बदल करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हयात मक्याची लागवड वाढविण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करावे असे ते म्हणाले.