दहिसर स्पोर्ट्स फाऊंडेशनतर्फे ध्वनिचित्रगीताद्वारे ‘कोरोना योद्धांचा’ सन्मान !

0
81

 

पंडित मोहिते-पाटील
उपसंपादक
‘दखल न्युज भारत’

मुंबई, दि.६ : दहिसर स्पोर्टस् फाऊंडेशनतर्फे महाराष्ट्रासह, मुंबई ‘कोरोना’मुक्त करण्यासाठी अथक प्रयत्नांची शिकस्त करणाऱ्या ‘कोरोना योद्धां’चा एका ध्वनिचित्रगीताद्वारे सन्मान केला जाणार आहे. ‘कोरोना योध्दां’चा सन्मान केला जाणाऱ्या ‘कोरोना बाय बाय’ या ध्वनिचित्रगीताचे यू ट्यूबवर प्रकाशन केले जाणार आहे. राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि प्रत्यक्ष ‘कोरोना’युद्धात पराक्रम गाजवणाऱ्या ‘योद्धयांचा’ यामध्ये गौरव करण्यात आला आहे.

आता नागरिकांनी ‘कोरोना’ला न घाबरता सुरक्षितता बाळगत पुनश्च हरिओम करण्याचा संदेश यामध्ये देण्यात आला आहे.
बोरिवली-दहिसरमध्ये ‘कोरोना’ला आता आळा बसला आहे. या यशाच्या शिल्पकारांचा या गीतात सन्मान करण्यात आला आहे. ‘कोरोना बाय बाय’ या ध्वनिचित्रगीताचे कवी मोहन सामंत,संगीतकार दत्ता थिटे असून प्रस्तुती दीपा सामंत यांची आहे.

याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून शिवसेना उपनेते,म्हाडा सभापती विनोद घोसाळकर, आमदार व विभागप्रमुख विलास पोतनीस, प्रसिद्ध गायक व संगीतकार अवधुत गुप्ते, महिला विभागसंघटक सुजाता शिंगाडे व मा.नगरसेवक, मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर उपस्थित राहणार आहेत.

सदर कार्यक्रम शनिवार दिनांक ०८ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ५.३० वा. विद्यामंदिर बॅक्वेट हॉल, छत्रपती शिवाजी रोड, दहिसर (पूर्व), मुंबई येथे संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे निमंत्रक दहिसर स्पोर्टस् फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष डॉ.अशोक मुळगावकर, चिटणीस दिलीप महांबरे, व खजिनदार भरत वासानी असून ‘कोरोना’संदर्भातील सुरक्षिततेचे सर्व नियमांचे पालन करुनंच कार्यक्रम होणार आहे.