लादीकाम करणाऱ्याच्या मुलाला ९२ टक्के, संस्था चेअरमन आ. भास्करराव जाधव यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार

143

 

प्रतिनिधी / ओंकार रेळेकर.

चिपळूण : येथील पेरेन्ट्स एज्युकेशन सोसायटीच्या एल. एम. बांदल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी  यावर्षी  दहावीच्या परीक्षेत अनोखे यश संपादन केले. लादीकाम करणाऱ्याच्या मुलाने तब्बल ९०.२० टक्के गुण मिळवले तर दुसऱ्या शाळेतून ९वीत ग्रेस मार्क मिळवून जेमतेम ३५ टक्के मिळवून बांदलमध्ये प्रवेश घेतलेला एका विदयार्थी तब्बल ८१ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला. या सर्व विदयार्थ्यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी केला. त्यावेळी ही किमया शिक्षकांच्या अथक परिश्रमामुळे घडल्याचे उद्गार त्यांनी काढले.
दहावीमध्ये शाळेत पहिला आलेला कु. अरूण कुमार गुप्ता याचे वडील श्री. सूर्यकांत गुप्ता हे लादी बसविण्याचे काम करतात. हे कुटुंब मूळचे उत्तरप्रदेशातील. पोटापाण्यासाठी चिपळुणात आलेल्या गुप्ता यांनी आपल्या मुलाला शिक्षणासाठी बांदल स्कूलमध्ये घातले. कुठलीही खासगी शिकवणी नसताना अरूणकुमार याने ९२ टक्क्यांहून अधिक गुण मिळवले.
कु. सरदार आरिफ अशरफ या विद्यार्थ्याने ८१ टक्के गुण मिळवले. तो मूळचा खेड तालुक्यातला. तिथेच एका शाळेत त्याचे शिक्षण सुरू होते. पण नववीमध्ये ग्रेस मार्कांच्या आधारे तो कसाबसा उत्तीर्ण झाला. हे पाहून चिपळूण येथे राहणारे त्याचे आजोबा इब्राहिम दादरकर हे त्याला चिपळुणला घेवून आले. त्याला दहावीमध्ये प्रवेश मिळावा म्हणून सर्व शाळांमध्ये फिरले, पण कोणीही त्याला प्रवेश देत नव्हते. शेवटी ते बांदल स्कूलमध्ये आले आणि त्यांच्या नातवाला प्रवेश मिळाला. शाळेच्या शिक्षणपध्दतीने त्याची अभ्यासातील गोडी वाढली आणि दहावीमध्ये त्याने अक्षरशः षटकार मारला.
शाळेच्या गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार नुकताच संस्थेचे चेअरमन आ. श्री. जाधव यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी इब्राहिम दादरकर यांना शाळेने आपल्या नातवामध्ये घडवून आणलेली प्रगती पाहून अक्षरशः गहिवरून आले होते. शाळेच्या शिक्षकांचे आभार मानताना त्यांनी आजकाल विदयार्थ्यांच्या प्रगतीसाठी मेहनत घेणारे असे शिक्षक अपवादानेच पहावयास मिळतात,  असे उद्गार काढून बांदलच्या शिक्षकांचा गौरव केला.
चेअरमन श्री. जाधव यांनी सांगितले की, आजकाल बहुतांश शाळा विदयार्थी नापास झाला तर शाळेच्या टक्केवारीवर परिणाम होईल म्हणून तो किती हुशार आहे, त्याची कौटुंबिक परिस्थिती काय आहे, हे तपासूनच विदयार्थ्यांना प्रवेश देतात. पण दुसऱ्या बाजूला बांदल स्कूल असे आहे की सगळीकडे फिरून प्रवेश मिळाला नाही तर विदयार्थी आमच्या शाळेत येतो. आमच्याकडे हमखास त्याला प्रवेश मिळतो आणि अशा विदयार्थ्यांना घडविण्याचे काम आमचे शिक्षक करतात याचा मला अभिमान वाटतो. शिक्षकांना स्वतःबद्दल आत्मविष्वास होता म्हणून अरूणकुमार असो वा सरदार अशरफ ही मुलं आज सत्काराला पात्र ठरली.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. विक्रांत जाधव, पंचायत समितीच्या सभापती सौ. धनश्री शिंदे, संस्थेचे संचालक श्री. बी. डी. शिंदे, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका सौ. प्रणिता शिंदे, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सौ. साक्षी शिंदे उपस्थित होत्या. शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. दिलीप घाग यांचाही यावेळी सेवानिवृत्तीबद्दल चेअरमन श्री. जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

*दखल न्यूज भारत*