विद्यार्थ्यांनी सर्वोच्च पदावर पोहोचण्यासाठी प्रयत्न करावा शिक्षणाधिकारी राजु तडवी

228

 

दिलीप अहिनवे
मुंबई महानगर प्रतिनिधी
‘दखल न्युज भारत’

घाटकोपर, दि. २१ : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घाटकोपर ‘एन’ विभागातील पंतनगर मनपा इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध ऑनलाईन स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. कोरोना महामारीमुळे सर्व जगच थांबले होते. शाळा, शिक्षण, शालेय क्रीडा स्पर्धा, इतर उपक्रम व अनेक क्षेत्रातील कामकाज ठप्प झाले होते. अशा प्रतिकुल परिस्थितीत ऑनलाईन माध्यमांद्वारे विविध स्पर्धांचे आयोजन अनेक संस्था व संघटनांनी केले होते. घाटकोपर मधील पंतनगर मनपा इंग्रजी शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली. विद्यार्थ्यांना ही संधी शारीरिक शिक्षण शिक्षिका नीता जाधव यांनी उपलब्ध करुन दिली.

ऑल इंडिया योगा असोसिएशन द्वारे आयोजित स्पर्धेत ५ विद्यार्थी, इंटरनॅशनल व्हर्च्युअल काता चॅम्पियनशिप स्पर्धेत २ विद्यार्थी, मुंबई महापौर ऑनलाईन सूर्यनमस्कार स्पर्धेत १७ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी कार्यालयात पार पडला. शिक्षणाधिकारी राजु तडवी, उपशिक्षणाधिकारी अजय वाणी व करी रोडचे पोलीस अधीक्षक काकडे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

शिक्षणाधिकारी राजु तडवी यांनी सांगितले की, मुलांनो तुमच्या या अप्रतिम यशामुळे मी खुप आनंदी झालो आहे. विद्यार्थ्यांनी नेहमीच मेहनत करावी व सर्वोच्च पदावर पोहोचण्यासाठी प्रयत्न करावा अशी इच्छा व्यक्त केली.

यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शारीरिक शिक्षण शिक्षिका नीता जाधव, मुख्याध्यापिका सुमन सिंग, कनिष्ठ पर्यवेक्षक अनिल सनेर, शारीरिक शिक्षण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रवींद्र परदेशी, वरिष्ठ पर्यवेक्षक राजेश गाडगे यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.