चेस द व्हायरस’ मोहिमेला यश, शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या प्रभागात ‘कोरोना’ला आळा

 

पंडित मोहिते-पाटील
उपसंपादक
‘दखल न्युज भारत’

मुंबई, दि.५ : दहिसर आर/उत्तर प्रभागात ‘कोरोना’ची लागण झालेल्या रुग्णांची दिवसेंदिवस वाढती संख्या चिंतेचा विषय होत चालला होता. हे लक्षात घेता शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक १ च्या शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी पालिका डॉक्टर अधिकारी व कार्यकर्त्यांच्या मदतीने विभागात दररोज आरोग्य शिबिर आयोजित करून विभागात ‘कोरोना’च्या संसर्गाला आता आळा बसला आहे.

पन्नास हजार लोकसंख्या असलेल्या दाटीवाटीने वसलेल्या गणपत पाटील नगर या वसाहतीत ‘कोरोना’चा संसर्ग होण्याचा मोठा धोका होता. शिवसेना नेते, पालकमंत्री मुंबई उपनगर ना.आदित्य ठाकरे यांनी केलेल्या ‘चेस द व्हायरस’ या संकल्पनेनुसार विभागात आढावा घेण्यात आला. या ठिकाणी घरोघरी जाऊन नागरिकांचे ‘थर्मल गन व प्लस ऑक्सिमिटर’ने तपासणी करण्यात आली. तसेच शौचालयाची दररोज स्वच्छता करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सोशल डिस्टनसिंग राखण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी स्टँडची व्यवस्था करण्यात आली.

तसेच याठिकाणी सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणं आढळल्यास रुग्णांवर त्वरित उपचार करण्यात आले. माजी नगरसेवक, मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली शाखाप्रमुख राजू इंदुलकर, जतीन परमार, लालचंद पाल, महिला शाखा संघटक ज्यूडी मेंडोसासह शिवसैनिकांची एक टीम, विभाग डॉक्टरासोबत घरोघरी जाऊन काम करीत होती.

अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे आता दिसून येत आहे. आनंदाची बातमी म्हणजे आज प्रभाग क्रमांक १ मध्ये ‘कोरोना’ची लागण झालेला एकही रुग्ण आढळला नाही. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. आर/उत्तर प्रभागातील सर्व ८ प्रभागात ‘कोरोना’ची लागण झालेले आतापर्यंत २ हजार ८०३ रुग्ण आढळले असून त्यातील २ हजार ५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर ५९० रुग्णांवर अद्यापही विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आतापर्यंत प्रभाग क्र. एक मध्ये सर्वात कमी २०४, प्रभाग क्र. दोन ३८४, प्रभाग क्र. तीन २९१, प्रभाग क्र. चार ३७०, प्रभाग क्र. पाच ५२१, प्रभाग क्र. सहा ४०७, प्रभाग क्र. सात ३२९ व प्रभाग क्र. आठ मध्ये २३१ ‘कोरोना’ची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. दरम्यान नागरिकांनी गाफील न राहता प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन अभिषेक घोसाळकर यांनी केले आहे.