सर्वसामान्याचं काम अडेल तेव्हा तुमची आठवण येईल साहेब.निलेश बोरूडे पत्रकार

129

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयाचे उपसचिव म्हणून निवड झाल्याची बातमी आली… एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा योग्य सन्मान होऊन त्याला बढती मिळाल्याचा आनंद होता; परंतु दुसऱ्या बाजूला मनाला चिंता लागली होती की आता सर्वसामान्यांसाठी कोण धावून येणार… पत्रकारिता सुरू केल्यापासून अनेक वेळा सार्वजनिक कामाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी राम यांच्याशी संपर्क आला… गेल्यावर्षी आलेल्या महापुरामध्ये लोकांचे अफाट नुकसान झाले तेव्हा एका शब्दावर जिल्हाधिकारी राम यांनी किरकटवाडी व परिसराला भेट दिली… ज्या लोकांची घरे वाहून गेली होती त्यांना आधार दिला तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या थेट शेतात जाऊन पाहणी केली…त्यावेळी जिल्हाधिकारी राम यांनी नुकसान ग्रस्त शेतकरी व घरे वाहून गेलेल्या नागरिकांना जो मानसिक आधार दिला तो त्यानंतर मिळणाऱ्या मदती पेक्षा कित्येक पटीने मोठा होता… दिवस असो वा रात्र… आपण फोन केला की तिकडून उत्तर यायचे, “निलेशजी बोला… काय म्हणताय!”..‌.साहेबांची मराठी शुद्ध नसली तरी त्यामध्ये अफाट आपलेपणा भरलेला असायचा… एकाही शब्दातून आपण कलेक्टर आहोत याचा गर्व त्यांनी कधीच जाणवू दिला नाही… प्रत्येक संभाषणामधून आमचं अधिकारी आणि पत्रकार म्हणून असलेलं नातं कमी होऊन आपुलकी वाढत गेली….दोघांच्याही कामांमध्ये अजिबात स्वार्थ नव्हता आणि काम करताना दोघांनाही स्वार्थ कधी आडवा आला नाही…. अगदी अलीकडे या कोरोना आपत्कालीन परिस्थितीत कामगारांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्या पासून ते गरजू रुग्णाला औषध उपलब्ध करून देण्यापर्यंत, पेशंट नेण्यासाठी ॲम्बुलन्स ची सोय करून देण्यापर्यंत साहेबांनी कोणतेही काम नाकारले नाही…. कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना पश्चिम हवेली तालुक्याकडे वरिष्ठ अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत असल्याबाबत मी लोकांसाठी एक बातमी केली…त्यामध्ये कलेक्टर साहेबांच्या नावाचाही उल्लेख होता…इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बातमी बाबत फोन करून माझ्याकडे नाराजी व्यक्त केली… परंतु जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मेसेज केला, “नीलेशजी तुम्ही लोकांसाठी लिहित आला आहात. तुमच्या लेखनावर मी अजिबात नाराज नाही. लोकांच्या प्रश्नांवर तुम्ही असेच लिहीत राहावे.”असा मनाचा मोठेपणा दाखवणारा संदेश जिल्हाधिकारी राम सरांनी पाठवला.
आज जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयाचे उपसचिव म्हणून निवड झाल्याची बातमी कळली तेव्हा लगेच त्यांना फोन लावला. निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले… आजही त्यांचे तेच शब्द होते… सर्वसामान्यांसाठी अहोरात्र उपलब्ध असणारा प्रत्येक अधिकारी असा असावा… सर्वसामान्यांची समस्या सोडवण्यासाठी तुम्ही केलेली मदत, तुम्ही दिलेला आधार कधीही विसरणार नाही आणि जेव्हा एखाद्या सर्वसामान्य माणसाचे काम अडेल आणि तेव्हा आता कोणाला फोन करायचा असा प्रश्न जेव्हा माझ्यापुढे उभा राहील… तेव्हा फक्त तुमची आणि तुमचीच आठवण येईल राम सर.