गट ग्रामपंचायत शिवराजपुर येथिल अर्धवट नाल्यांचा उपसा – गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात, ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष

87

सत्यवान रामटेके(गडचिरोली उपजिल्हा प्रतिनिधी)
दखल न्यूज भारत
देसाईगंज तालुक्यातील गट ग्रामपंचायत शिवराजपुर येथील ऐन पावसाळ्याच्या दिवसात महत्वाचे स्रोत समजल्या जाणाऱ्या नाल्यांचा उपसा अर्धवट केला असल्याने गावातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.नालीमध्ये कुजलेला कचरा,गाळ व मातीचे ढीग जमा होऊन डासांचा प्रादुर्भाव होत असल्याने गावातील नागरिक व जवळच लागून असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
तालुक्यातील तीन गावे मिळून शिवराजपुर ही गट ग्रामपंचायत आहे.यामध्ये शिवराजपुर,ऊसेगांव व फरी या तीन गावांचा समावेश होतो.मुख्य म्हणजे ग्रामपंचायतीने पावसाळ्याच्या सुरुवातीलाच उन्हाळ्यात गावातील नाल्यांचा उपसा केला होता.उपसा तर केला मात्र गावातील काही परिसरातील जसे,ग्रामपंचायतीला लागूनच असलेल्या नालीचा उपसा,शिवराजपुर मुख्य मार्गावरील उपसा,जिल्हा परिषद शाळेजवळील उपसा व इतर परिसरातील नाल्यांचा उपसा केला गेला नसल्याने त्याठिकाणी अजूनही मातीचे थर,कचऱ्याचे ढीग व कुजलेला गाळ असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.ज्या ठिकाणी ग्रामपंचायत वास्तव्यास आहे त्याचठिकाणची अशी अवस्था असेल तर इतर ठिकाणची अवस्था कशी असणार?असा प्रश्न ग्रामपंचायत प्रशासणावरती उभा येऊन ठाकला आहे.ऐन पावसाचे दिवस सुरू असल्याने कुजलेल्या गाळामुळे व साचलेल्या कचऱ्याच्या ढिगामुळे डास, किळे व काही दिवस पाणी साचल्याने अतिसार, संसर्गजन्य रोग,हिवताप,मलेरिया सारखे रोगाची लागण होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने
ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेऊन नाल्यांचा उपसा योग्यप्रकारे करणे आवश्यक आहे.
केवळ वरवर सफाई व आतमध्ये छपाई करून चालणार नाही तर जनताजनार्धन यांचाही विचार करणे गरजेचे असल्याचे असे सुजाण नागरिकांकडून बोलल्या जात आहे.