सोशल डिस्टनशिंगचा नियम पाळा व मास्कचा वापर करा अन्यथा कारवाई- उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे कारवाईसाठी चार पथके तैनात

138

 

प्रतिनिधी / प्रसाद गांधी.

चिपळूण : चिपळुणात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून चिपळूण पोलिस व चिपळूण नगर परिषदेच्या चार पथकांच्या माध्यमातून सोशल डिस्टनशिंगचा नियम न पाळणाऱ्या व विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी दिली आहे. चिपळुणात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाने ५०० चा आकडा ओलांडला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात मुंबईकर चाकरमान्यांना कोरोना होत होता. मात्र, नंतर स्थानिक नागरिकांना कोरोनाची लागण होऊ लागली आहे. आता तर कोरोना चिपळूणवासीयांची पाठ सोडताना दिसत नाही. यामुळे चिपळूणवासीयांसह प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. तर दुसरीकडे सोशल डिस्टनशिंगच्या नियमाचा काहींकडून भंग होतांना दिसत आहे. तसेच काही लोक विना मास्क फिरतांना आढळत आहेत. एकंदरीत काही लोकांनी कोरोना गांभीर्याने घेतला नसल्याचे चित्र आहे. यामुळे पोलिस व नगर परिषद प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी माहिती देताना सांगितले की, चिपळूण पोलिस व नगर परिषदेची चार संयुक्त पथके तयार करण्यात आली असून या पथकांच्या माध्यमातून सोशल डिस्टंसिंगचा नियम न पाळणाऱ्यांवर १४४ चा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केली जातील तर विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडाची तात्काळ कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती दिली आहे. तरी नागरिकांनी ही कारवाई टाळण्यासाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी केले आहे.

*दखल न्यूज भारत*