जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या अध्यक्षतेखाली अन्न सुरक्षा व मानदे कायदाबाबत सल्लागार समितीची बैठक संपन्न

88

 

 

दखल न्यूज भारत
प्रतिनिधी/महेश तागडे

प्रतिनिधी / गडचिरोली : अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 व अंतर्गत नियम 2011 चे प्रभावी अंमलबजावणीकरिता गठीत सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांचे अध्यक्षतेखाली आज 23 जुलै 2021 रोजी पार पडली. सदर बैठकीचे आयोजन अभय देशपांडे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन म.रा.गडचिरोली यानी केले होते. सदर बैठकीत संजिव ओहळ, मुख्याधिकारी, नगर परिषद, डॉ.अनिल रुडे, जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. शशिकांत शंभरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, एस.पी.यादव , जिल्हा दुग्धविकास अधिकारी, उल्हास भुसारी, पोलिस निरिक्षक  क्राईम ब्रांच,  दिलीप सारडा, व किरन पोहणकर व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी, अविनाश महाजन, तसेच पोलीस अधिक्षक कार्यालय व मुख्य कार्यकारी अधिकारी गडचिरोली यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यात 05 ऑगस्ट 2011 पासुन लोकांना निर्भेळ, सुरक्षित व चांगल्या प्रतिचे अन्न मिळावे व पर्यायाने जनतेचे आरोग्य चांगले रहावे या करिता कायद्याची अंमलबजावनी सुरु झाली. अन्न व औषध प्रशासनातर्फे खाद्य विक्रेते, उत्पादक यांची नियमित सखोल तपासणी करुन तसेच अन्न पदार्थाचे नमुने घेउन दोषी व्यक्तिवर योग्य ती कारवाई केली जाते.
जिल्हाधिकारी यांनी पोलीस विभागाच्या मदतीने प्रतिबंधित अन्न पदार्थावर कारवाया घ्याव्या व दोषी विरुध्द भां.द.वि चे कलम 328 अंतर्गत गुन्हा नोंदवावा असे सुचित केले. तसेच मुख्याधिकारी नगर परिषद यांना आठवडी बाजारातील भाजी, मांस, मटन व हातगाडीवरील विक्रेते यांना अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत परवाना घेण्यास बाध्य करण्याबाबत कार्यवाही घ्यावी. तसेच जिल्हा दुग्धविकास अधिकारी व अन्न व औषध प्रशासन यांनी संयुक्तपणे दुध भेसळीवर नियंत्रण करण्याकरीता नियोजन करावे असे सुचित केले. जिल्हाधिकारी यांनी अन्न व औषध प्रशासनाने घेतलेल्या कार्यवाहीची माहिती घेऊन समाधान व्यक्त्त केले. तसेच सर्व शासकीय विभागाशी योग्य ते समन्वय राखुन जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टिने प्रभावीपणे कार्य करावे असे सांगितले. अभय देशपांडे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, यांनी आभार व्यक्त केले व सदर बैठकीचे समापन झाले.