रत्नागिरीतील आरोग्यव्यवस्था धाराशाही या मृत्यूगोलात प्रवेश करण्यापूर्वी अभ्यागतांनी आरोग्य सुविधांची माहिती करूइन घ्यावी : अॅड. पटवर्धन

0
75

 

प्रतिनिधी / गौरव मुळ्ये.

रत्नागिरी: गणरायाच्या स्वागतासाठी आतुर होऊन रत्नागिरीमध्ये येणाऱ्या अभ्यागतांना रत्नागिरीतल्या भीषण आरोग्य सुविधेची माहिती होणे गरजेचे आहे. रत्नागिरीतील वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्हा रुग्णालयावर अतिरिक्त ताण आहे. अपुरी डॉक्टर संख्या, स्वॅब टेस्टसाठी जाणारा प्रदीर्घ वेळ, नर्स, वॉर्डबॉय, यांची कमतरता दररोज जिल्हा रुग्णालयातील कोरोनाग्रस्त होणारे कर्मचारी यामुळे कोरोना पेशंटची अवस्था दयनीय आहे. कोरोनाच्या या प्रकोपकारी वातावरणात प्रायव्हेट डॉक्टर, प्रायव्हेट हॉस्पिटल त्यामध्ये आरोग्य सुविधा प्राप्त होणे दुरापास्त झाले आहे, सध्याचा असलेला ताण अभ्यागतांची वाढती संख्या पाहता काही पटीत वाढणार आहे. डॉक्टर संघटने’नेही अभ्यागतांना येण्यापासून रोका असे आवाहन केल्याचे ऐकिवात आहे. ‘१०० बेड चे कोव्हीड हॉस्पिटल सुरू होणार, सुरू होणार’ अशा घोषणा होतात. पण त्या हवेत विरून जातात. अशा अत्यंत चिंतनीय स्थितीत स्थानिक जनतेला पुरेशा आरोग्य सुविधा शासन देऊ शकत नाही. ते शासन बाहेरून रत्नागिरीत येणाऱ्यांसाठी ‘ई-पास’ प्रदान करते ही गोष्ट आकलनापलीकडील आहे. सातत्याने लक्ष वेधूनही आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्याची मानसिकता राज्यशासनाची नाही. राज्यशासन अन्य गोष्टींप्रमाणे आरोग्य सुविधांबाबत पूर्ण उदासीन आहे. कोरोनाग्रस्तांना अविरत सेवा देणाऱ्या काही परिचारिकांचे पगार ४ महिने होत नाहीत. इतके आर्थिक आणि मानसिक दारिद्र्य राज्यशासनाला आले आहे याबाबत माहिती घेऊन मगच अभ्यागतांनी रत्नागिरीत यावे, असे आवाहन अॅड. दीपक पटवर्धन भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष यांनी केले आहे.

*दखल न्यूज भारत*