नक्षलवाद कमी करण्यासाठी बेरोजगारांच्या हाताला काम देण्याची आवश्यकता : पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे

148

 

रोशनी बैस दखल न्युज भारत

गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद कमी करण्यासाठी बेरोजगारांच्या हाताला काम देण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्याचे नगरविकास व सार्वजनिक उपक्रम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी केले.
स्थानिक नियोजन भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ना. एकनाथ शिंदे बोलत होते. जिल्ह्याचा विकास करण्यावर भर असल्याची माहिती यावेळी ना. शिंदे यांनी दिली. जिल्ह्यात शिक्षण, आरोग्य, रस्ते यासोबतच विविध मूलभूत सुविधा आवश्यक असून त्या पुरविण्यासोबतच जिल्ह्यातील दळणवळण यंत्रणा सुसज्ज करून प्रत्येकाला इंटरनेट, विजही मिळेल याकरिता प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत लवकरच बैठक घेऊन यावर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर ओबीसी आरक्षण, बिंदूनामावली, वन मजुरांचे प्रश्न, शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या योजनांचा लाभ, या समस्या सोडविण्याचे त्यांनी आश्वासन दिले. इतर जिल्ह्याच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्याला विकासाच्या रांगेत आणण्यासाठी तज्ज्ञ लोकांची मदत घेतली जाईल, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली.