हर्ष साखरे तालुका प्रतिनिधी
आरमोरी : कोरोना विषाणूच्या संकटकाळात कोणत्याही दुकानात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या दुकानदारावर १० हजारांचा दंड ठोठावण्यात येईल, असा निर्णय किराणा असोसिएशनच्या बैठकीत सर्वानुमते पारित करण्यात आला आहे.
कोरोना विषाणूचे वाढते प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हाधिका-यांनी तंबाखूबंदीचे आदेश दिले आहे. त्यानुसार आरमोरी शहर १०० टक्के तंबाखूमुक्त करण्यासाठी आरमोरी किराणा असोसिएशन व मुक्तीपथ अभियानाची वाटचाल सुरू आहे. यासाठी १५ जुलै रोजी मुक्तीपथ व किराणा असोसिएशन यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत सर्व किराणा विक्रेत्यानी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला होता. त्यानुसार पुन्हा ३० जुलै रोजी बैठक घेण्यात आली. यावेळी कोणत्याही प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणा-यावर आरमोरी किराणा असोसिएशन १० हजारांचा दंड आकारणार तसेच असोशीएशनच्या निर्णयाला न जुमानता तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केल्यास त्याला पोलिसांच्या स्वाधीन केल्या जाईल. असा निर्णय या बैठकीत सर्वानुमते पारित करण्यात आला. तसेच असोशीएशनच्या पुढाकाराने आरमोरी शहरातील तंबाखू विक्रीत ५० टक्यांनी घट झाली असल्याचा दावा किराणा असोशीएशनने केला असून तंबाखूमुक्त शहराकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे निश्चितच सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व छुप्या मार्गाने खर्रा विक्रीवर अंकुश लागणार आहे.
आरमोरी पोलिस स्वतंत्र कठोर कारवाई करणार
मुक्तीपथ आणि पोलीस प्रशासनाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत आरमोरी किराणा असोसिएशनने तंबाखू विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मुक्तीपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता यांनी पोलिस निरीक्षक दिगांबर सूर्यवंशी यांना दिली. पोलिस अधीक्षक यांनी सर्व पोलिस स्टेशनला तंबाखू विक्रीवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार आरमोरी पोलिस मुक्तीपथ अभियानाच्या समन्वयातून मुजोर तंबाखू विक्रेत्यांवर स्वतंत्र कारवाई करीत १०० टक्के तंबाखूमुक्त आरमोरी शहर करू, अशी ग्वाही ठानेदार सूर्यवंशी यांनी दिली. यावेळी मुक्तीपथचे तालुका संघटक निलम हरिनखेडे उपस्थित होत्या.