लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या समन्वयातून जिल्ह्याचा विकास -पालकमंत्री एकनाथ शिंदे सिरोंच्या व अहेरी तालुक्यात भेट

124

 

संपादक जगदिश वेन्नम

गडचिरोली,(जिमाका)दि.02: गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील विविध योजनांची अंमलबजावणी करताना स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच प्रशासन यांनी समन्वयातून काम केल्यास चांगल्या प्रकारे विकासाला गती मिळेल असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेले सिरोंचा येथे केले. सिरोंचा तालुक्यात जाऊन तेथील कोविड सेंटरला भेट देऊन प्रशासनाने केलेल्या व्यवस्थेची पाहणी त्यांनी केली. यावेळी ब्रिटीशकालीन तहसील कार्यालयास भेट देऊन त्याठिकाणी वृक्षरोपणही केले. सिरोंच्या तालुक्यातील नव्याने बांधण्यात आलेल्या पातागुडम पुलाची पहाणी केली. तसेच त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या संवेदनशील परिसरातील गावांना भेट देत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. नक्षलवाद्यांच्या त्रासाला बळी पडलेल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. राज्य सरकार त्यांच्या पाठीशी खंबीर उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, तहसिलदार सिरोंचा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रुडे, मुख्याधिकारी विशाल पाटील, नायब तहसीलदार हमीद सय्यद, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर वलके उपस्थित होते. दुर्गम व अतिशय संवेदनशील भागात आऊटपोस्टवर असलेल्या जवानांना ते भेटले व त्यांच्या अडचणी समजून घेऊन प्रशासनाला त्या सोडविण्यासाठी सांगितले. पात्तागुडम येथील पोलीस स्थानकाला भेट देऊन तेथील पोलीस, एसआरपीएफ, बीएसएफ जवानांकरिता उभारण्यात आलेल्या वसतिगृह तसेच तेथील कॅन्टीन व इतर व्यवस्थापनाची पाहणी केली. तसेच तेथील गावकऱ्यांशीही संवाद साधून त्यांच्या अडचणी जिल्हा प्रशासनाला सोडविण्यासाठी निर्देश दिले. त्याचबरोबर मेडिगट्टा प्रकल्पाची पाहणी करुन महाराष्ट्रातील प्रकल्पासाठी गेलेल्या भूभागाची पाहणी हवाई मार्गे त्यांनी केली.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलापल्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, कोविडचा उपचार घेत असलेल्यानांही भावनिक आधाराची गरज असते. यासाठी त्यांनी आरोग्य विभागातील कर्मचारी यांची भेट घेतली व रुग्णांच्या व त्यांच्या अडी-अडचणींची चौकशी केली. तेथील व्यवस्था उत्तम असून दुर्गम भागात अशाच सुविधांची प्रत्येक ठिकाणी गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा प्रशासन यांनी एकत्रित सहभाग घेतला तर जिल्हा मुख्य प्रवाहात नक्कीच येईल. याठिकाणी निसर्गरम्य वातावरण आहे. पाणी भरपूर आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदय यांचेशी चर्चा करुन या भागात आरोग्य सेवा उत्तम करण्यासाठी लवकरच नियोजन होईल. तसेच रस्ते, इतर प्रलंबित कामे पूर्ण करून या भागातील लोकांना रोजगार व हाताला काम दिल्यास नक्षलवाद कमी होईल असे मत त्यानी व्यक्त केले. आहेरी येथे यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, सहाय्यक जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, तहसिलदार ओंकार ओतारी, उपविभागीय पोलीस अधिकारी बजरंग देसाई उपस्थित होते.