आता वणी चे नाव जगभर पोहचेल! वणी जवळ सापडली पृथ्वी वरील पहिल्या सजीवांची जीवाश्मे पृथ्वी वरील पहिले जीव, विदर्भात होता समुद्र, स्ट्रोमाटोलाइटचे दुर्मीळ जीवाश्म

0
202

 

वणी : परशुराम पोटे

यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहराल गतच्या ग्रामीण भागात अति प्राचीन काळात समुद्रात तयार झालेले विविध काळातील चूनखडक आढळतात. ह्याच चुनखडकात २०० ते १५० कोटी वर्षाच्या निओ-प्रोटोरोझोईक काळात तेव्हा इथे असलेल्या समुद्रात पृथ्वीवर प्रथम विकसित झालेल्या सायनोबेक्टेरीया ( स्ट्रोमाटोलाईट) या सूक्ष्म जीवांचे चुनखडकातील अतिशय दुर्मिळ जीवाश्म सापडले आहेत. चंद्रपूर येथील पर्यावरण आणि भुशास्त्र अभ्यासक प्रा सुरेश चोपणे ह्यांनी ही दुर्मिळ शोधून काढली आहेत.
पृथ्वीची उत्पत्ती ४.६ अब्ज वर्षापूर्वी झाली परंतु सजीवांची उत्पत्ति मात्र ३ ते ४ अब्ज वर्षादरम्यान झाली. जगात काही ठिकाणीच असे जीवाश्म सापडले आहेत, त्यांना स्ट्रोमाटोलाईट (Stromatolite) असे म्हणतात. ह्या सूक्ष्मजीवांना सायनो बेक्टेरीया ( Cyanobacteria) असे म्हणतात. विदर्भातील चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात १५० ते २०० कोटी वर्षाच्या निओ प्रोटेरोझोईक (Nioproterozoic) काळात तयार झालेल्या चुनखडकात हे जीवाश्म आढळतात. तेव्हा समुद्राच्या उथळ उष्ण पाण्यात तयार झालेल्या चिखलात हे जीवाणू विकसित झाले. ती पृथ्वी वरील प्रथम विकसित झालेली जीव होती ही सर्व आदीजीव खनिजे खाऊन ती जगत होती. पुढे अश्याच जीवांपासून बहुपेशीय जीव विकसित होत गेले. मासोळ्या, सरपटणारे जीव विशाल आकाराचे डायनोसोर ते पुढे मानव असा सजीवांचा विकास झाला. चंद्रपूर आणि वणी परिसरात चांदा, बिल्लारी आणि पेनगंगा ग्रुपच्या चुनखडकात स्ट्रोमेटोलाईटची जीवाश्मे आढळली. ह्या सजीवांना शास्त्रीय भाषेत कुकोकल्स (Chroococales) आणि ओर्कोटोरीअल्स (Oschilatorials) असे म्हणतात. ही जीवाश्मे चिखलात गोल आकाराची गुंडाळी करून समुहाने राहत होती. पुढील क्रिटाशिअस काळात भूगर्भीय घडामोडीमुळे समुद्र दूर गेला आणि चीखलांचे रुपांतर चुनडकात झाले आणि जीवांचे रुपांतर जीवाश्मात झाले. आजही करोडो वर्षानंतरही चुनखडकात सजीवांच्या प्रतिमा स्पस्ट दिसतात. ही जीवाश्मे यवतमाळ जिल्ह्यातील वणी जवळ मोहोरली बोर्डा परिसरात आढळली असल्याचे प्रा सुरेश चोपणे ह्यांनी सांगितले.
प्रा सुरेश चोपणे हे मुळचे वणीचे असून ते ह्या परिसरात नियमित ऐतिहासिक आणि भौगोलिक संशोधन करीत असतात. दोन वर्षापूर्वी त्यांनी चंद्रपूर जवळ स्ट्रोमाटोलाइटची जीवाश्मे शोधून काढली होती. १५ वर्षापूर्वी वणी परिसरातील बोर्डा येथे झालेल्या भूकंपाचात्यांनी अभ्यास केला होता. यवतमाळ जिल्यात त्यांनी ५ ठिकाणी पाषाण युगीन स्थळे तर ४ ठिकाणी कोट्यावधी वर्षापूर्वीची शंख-शिंपल्यांची जीवाश्मे शोधून काढली असून चंद्रपूर येथे त्यांचे स्वताचे शैक्षणिक दृष्ट्या अश्म, जीवाश्म संग्रहालय स्थापन केले आहे. चुनखडकात आढळलेली ही अतिशय महत्वाची स्ट्रोमाटोलाइट ची जीवास्मे प्रथमच त्यांना आढळली आहेत. ते गेल्या 2 वर्षापासून ते ही जीवाश्मे शोधत होते. प्रथम आस्ट्रेलिया मध्ये ही जीवाश्मे मोठ्या प्रमाणावर आढळली होती. भारतात भोजुन्दा, राजस्तान, चित्रकुट, मध्य प्रदेश आणि चंद्रपूर, महाराष्ट्र येथे आढळली आहेत. ह्या संशोधनामुळे वणी शहराचा प्राचीनतम भौगोलिक इतिहास कळला असून ह्यामुळे वणी शहराचे नाव जगभर पोहोचेल. ह्या जीवाष्मांच्या संशोधनामुळे जीवशास्त्र, भुशास्त्र आणि जीवाश्म शास्त्राच्या अभ्यासाला चालना मिळेल असा विश्वास प्रा सुरेश चोपणे ह्यानि व्यक्त केला.