तालुक्यात दीड महिन्यापासून 18 तासाचे भारनियमन शेतकरी त्रस्त उकाड्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न शास्त्रीय कामकाज बंद

143

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक
दखल न्यूज भारत

कोरची:-दि 2 अगस्ट
स्मार्ट सिटी डिजिटल इंडिया यासारख्या चटपटीत घोषणा शासन-प्रशासन शासनाकडून दिल्या जात असल्या तरी गडचिरोली या आदिवासी जिल्ह्यातील कोरची तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून तब्बल 18 तास भारनियमन केल्या जात आहे.उरलेल्या सहा तासात तुकड्या-तुकड्यात वीज पुरवठा होत असल्याने नागरिक प्रचंड त्रासले आहेत. पावसाअभावी रोवण्यात खोळंबल्या असून भारनियमनामुळे शेतीची कामे करणे अशक्य झाले आहे. सोबतच उकाड्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर प्रश्न निर्माण झालेला आहे. विजे अभावी शासकीय कार्यालयाचे कामकाज जवळपास बंदच आहेत वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता आणि वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन सुद्धा भारनियमन प्रश्न निकाली न निघाल्याने नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या कोरची तालुक्याला पूर्वी गोंदिया जिल्ह्याच्या चिचगड येथून वीज पुरवठा केल्या जात होता परंतु गोंदिया जिल्हा वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाने कोरची गडचिरोली जिल्ह्याचा भाग म्हणून वीस महिन्यापूर्वी वीज पुरवठा खंडित केला. आता कोरची तालुक्यात कुरखेडा येथून वीज पुरवठा केल्या जात आहे. कोरची तालुक्यात 33 केव्ही विजेची आवश्यकता आहे. मात्र पुरवठा केवळ 18 के व्हीं चा होत असल्याने चोवीस तासांपैकी अठरा तास भारनियमन तर केवळ सहा तास वीजपुरवठा सुरू आहे. संपूर्ण कोरची तालुक्यात सलग वीजपुरवठा करणे शक्य नसल्याने तीन तुकड्यात विभागून दोन-दोन तास वीज पुरवठा करण्यात येत आहे.
कोरची तालुक्यात 133 गावे असून 29 ग्रामपंचायती आणि एक नगरपंचायत आहे एक पोलीस स्टेशन, तीन पोलीस मदत केंद्र , एक ग्रामीण रुग्णालय, दोन प्राथमिक आरोग्य केंद्र , तीन आरोग्य पथक, एक राष्ट्रीयकृत बँक, जिल्हा सहकारी बँकेच्या शाखा, तहसील कार्यालय, पंचायत समिती आदी शासकीय कार्यालये कोरची तालुक्यात आहेत . स्मार्ट सिटी डिजिटल इंडिया सारख्या घोषणा शासन प्रशासनाकडून देण्यात येत आहेत मात्र एकाच संपूर्ण तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून 24 तासात पैकी केवळ सहा तास तेही तुकड्या-तुकड्यात वीज मिळत आहे. तुकड्या-तुकड्यात मिळत असल्याने शासनाच्या योजना नागरिका पर्यंत पोहोचणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या काही काळापासून पावसाने दडी मारली आहे. शेतीची कामे खोळंबली आहेत . मोटर पंप लावून शेतीची कामे करण्यास भारनियमन आडकाठी ठरत आहे . पावसा अभावी उष्माघात प्रचंड वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे . डासांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. पंख्या शिवाय झोपच अशक्‍य होत आहे . असे असले तरी रात्री काही वेळ विजेचा पुरवठा होत असल्याने पंखे चालविण्याची सुद्धा शक्यता संपली आहे यावर उपाय म्हणून काही नागरिकांनी इन्व्हर्टर खरेदी केले. मात्र वीजच नसल्याने इन्व्हर्टर चार्ज करता येत नाही त्यामुळे नागरिकांची झोपच गायब झाली आहे.
नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता देशपांडे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे कार्यकारी अभियंता विजय मेश्राम आणि वीज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी कोरची येथे आले . भारनियमनाचे समस्या मार्गी लावू असे आश्वासन देऊन निघून गेले मात्र अठरा तास भारनियमनाची समस्या जैसे थे कायम आहे. भारनियमनामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.