सामाजिक वनीकरण विभाग गडचिरोलीच्या कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार -दिलेल्या पत्रावर मागील तीन दिवसांपूर्वीची टाकली तारीख

0
124

सत्यवान रामटेके(देसाईगंज ग्रामीण तालुका प्रतिनिधी)
सामाजिक वनीकरण गडचिरोली विभागाच्या कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार एका माहिती अधिकार अपिलीय अर्जाच्या सुनावणीसाठी दिलेल्या पत्राद्वारे उघडकीस आले असून अपिल केलेल्या अर्जाची तारीख पुढे व विभागातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या पत्रावरील तारीख मागील तीन दिवसांपूर्वीची असल्याने विभागातील कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
सविस्तर वृत्त असे की,संबंधित विभागाला माहिती अधिकार अर्जाद्वारे मागितलेली माहिती ३० दिवसात मिळाली नसल्याने सामाजिक वनीकरण विभाग गडचिरोली येथील कार्यालयात अपिलीय अधिकारी यांच्याकडे प्रथम अपील अर्ज दिनांक २४ मे २०२१ रोजी एका इसमाने दाखल केले होते.अर्ज दाखल केल्यानंतर विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग गडचिरोली यांच्या कडून सदर अर्ज दाखल केलेल्या इसमाला गडचिरोली एस ओ येथून १ जून २०२१ रोजी टपालाद्वारे पत्रव्यवहार करण्यात आला होता.टपालाद्वारे पत्रव्यवहार तर करण्यात आला मात्र सदर पत्र ५ जून २०२१ रोजी सदर इसमाला मिळाला असल्याने २ जूनला ठेवलेली सुनावणी घेण्यातच आली नाही.सुनावणी तर झालीच नाही मात्र आश्चर्यकारक बाब म्हणजे सामाजिक वनीकरण गडचिरोली येथील विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेला पत्रव्यवहार हास्यास्पद असल्याचे दिसून येत आहे.सदर इसमाला केलेल्या पत्रव्यवहारातील तारीख तीन दिवसांपूर्वीची म्हणजे प्रथम अपील अर्ज करण्यात आलेली तारीख २४ मे २०२१ असून सामाजिक वनीकरण कार्यालयाकडून दिलेल्या पत्रव्यवहार क्रमांक-कक्ष-१/लेखा/२०२१-२२/९६ गडचिरोली,दिनांक – २१ मे २०२१ असा आहे.यावरून असे लक्षात येते की,सदर पत्रव्यवहार करण्यात आलेले सामाजिक वनीकरण विभाग गडचिरोली येथील कर्मचारी किती कार्यतत्पर आहेत.माहिती अधिकार अर्जावर जर अशा प्रकारच्या चुका करीत असतील तर इतर पत्रावर किती?असा प्रश्न निर्माण होत आहे.असा भोंगळ कारभार करणाऱ्या सामाजिक वनीकरण विभाग गडचिरोली येथील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सदर माहिती अधिकार अर्ज दाखल करणाऱ्या इसमाने केली आहे.