मुगाच्या पिकावर अज्ञात रोगाचे आक्रमण नुकसान भरपाई देण्याची कपिल ढोके यांची कृषी मंत्र्यांकडे मागणी.

108

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

पावसाळ्याच्या सुरुवातीला राज्यभरात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी अत्यंत उत्साहात पेरणीला सुरुवात केली. खरीप हंगाम चांगल्या अवस्थेत असताना अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा, बाळापूर तालुक्यात मुगाच्या पिकावर अज्ञात रोगाने आक्रमण केले. यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. नुकसानग्रस्त भागाचे तातडीने सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रवक्ता कपिल ढोके यांनी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.
विविध संकटांमुळे शेतकरी पुरता हादरला आहे. काही ठिकाणी दुबार तर काही ठिकाणी तिबार पेरणीची वेळ आली आहे. मुगाचे पीक हातातून निघून गेल्याने शेतकरी विमनस्क अवस्थेत आहे. अज्ञात रोगाविषयी शेतकऱ्यांना माहिती नसल्याने उपाय योजना करणेही शक्य होत नाही.त्यामुळे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी संशोधन करून उपायोजना कराव्या तसेच मुगाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यां च्या
बँक खात्यात तातडीने नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्यात यावी असेही ढोके यांनी म्हटले आहे. सोबतंच संबंधीत रोगाविषयी शेतकर्‍यांमधे माहीती जनजागृती करुन त्यावर उपाययोजना करण्यासंदर्भात समुदेशन सुद्धा शासन स्तरावरुन करण्यात यावे अशी मागणी सुद्धा कपिल ढोके ह्यांनी केली.
सदर निवेदनाची प्रतीलीपी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे जिल्हाधिकारी अकोला तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.