Home गडचिरोली धान्य खरेदी केंद्राअभावी व्यापारी वर्गांकडून धानाला कवडीमोल भाव – प्रति क्विंटल १३००...

धान्य खरेदी केंद्राअभावी व्यापारी वर्गांकडून धानाला कवडीमोल भाव – प्रति क्विंटल १३०० रुपये भाव देऊन शेतकरी बांधव आर्थिक अडचणीत

83

सत्यवान रामटेके(देसाईगंज ग्रामीण तालुका प्रतिनिधी)
देसाईगंज तालुक्यातील रब्बी हंगामातील शेतकरी बांधवांची धानाची विक्री करण्यासाठी अद्यापही शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रे सुरू झाली नसल्याने शेतकरी बांधव खाजगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करीत आहेत.खाजगी व्यापारी कवडीमोल भाव देऊन शेतकरी बांधवांची अक्षरश: आर्थिक लूट करीत असल्याचे दिसून येत आहे. देसाईगंज तालुक्यातील सिंचनाच्या सोयी असलेल्या व पाटबंधारे विभागाच्या नहराच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी खरिपाला पर्याय म्हणून रब्बी हंगामात धानपिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली. धानाची काही दिवसांपूर्वी कापणी झाली असून बहुतेक शेतकऱ्यांनी मळणीसुद्धा केली आहे.मात्र अजूनही शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रे सुरू झाली नसल्याने शेतकरी बांधवांनाआर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.त्यासाठी आर्थिक अडचणी लक्षात घेता गावातील वा इतर खाजगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करणे सुरू आहे.खाजगी व्यापारी यांना कोणतेही निर्बंध नसल्याने शेतकरी बांधवांच्या अडचणींचा फायदा घेऊन प्रति क्विंटल १३०० रुपये भाव देऊन शेतकऱ्यांची अक्षरश: आर्थिक लूट करीत आहेत.शेतकरी बांधवांनी हात उसनवारी घेतलेली रक्कम,बँकेकडून घेतलेले कर्ज व दैनंदिन खर्च करणे कवडीमोल भावामुळे कठीण झाले आहे.
अशातच खाजगी व्यापारी कमी भावाने शेतकऱ्यांकडून धान खरेदी करून चढ्या दराने विक्री करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.शेतकरी वर्गांचे धान निघण्याच्या वेळेस लवकरात लवकर धान्य खरेदी केंद्रे सुरू केली गेली तर शेतकरी बांधवांना कवडीमोल भावात धान्य विकावे लागणार नाही.याकरीता खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकरी बांधवांची होणारी आर्थिक लूट थांबविण्यासाठी शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्रे सुरू करावीत अशी मागणी शेतकरी वर्गांकडून केली जात आहे.

Previous articleअत्यंत संतापजनक घटना सेक्सला….. नकार दिल्याने पतीने केली पत्नीची हत्या
Next articleदारूबंदी ब्रेकिंग चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी उठविली