बुद्ध पौर्णिमेनिमित्त तथागत गौतम बुध्दांविषयी थोडक्यात माहिती..

61

 

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी

नेपाळमध्ये (पूर्वीचा अखंड भारत) शाक्यांचं राज्य होतं. राजा शुद्धोधन हे या राज्याचे नेतृत्व करीत होते. या राज्याची राजधानी कपिलवस्तू हि होती. शुद्धोधन यांच्या पत्नीचे नाव महामाया (मायादेवी) असे होते. काही कथांनुसार गौतम बुद्धांच्या जन्माच्या आधी महामायाला एक स्वप्न पडले. या स्वप्नात तिला एक पांढरा हत्ती दिसला, ज्याला ६ दात होते. तो हत्ती तिच्या कुशीत शिरताना तिला दिसला. त्यावेळेस हत्ती हे चिन्ह भरभराटीचे मानले जायचे. त्यानंतर लुंबिनी मधील बागेत फिरताना एका झाडाच्या फांदीला लटकूनच माया देवी यांनी सिद्धार्थ ला जन्म दिला. माया देवी यांच्या निधना नंतर सिद्धार्थची मावशी महाप्रजापती गौतमी यांनी सिद्धार्थ याचा सांभाळ केला.

सिद्धार्थाच्या जन्मांतर एका ज्योतिषाने त्यांचे भविष्य वर्तवताना सांगितले होते कि, हा मुलगा एकतर चक्रवर्ती सम्राट होईल किंवा महान तपस्वी होईल. या भविष्यवाणीमुळे राजा शुद्धोदन यांनी राजपुत्र सिद्धार्थला अगदी लाडात वाढवले. बाहेरच्या जगातील दुख सिद्धार्थला कळू नये, म्हणून शुद्धोदन यांनी त्याला राजवाड्याबाहेर पडूच दिले नाही. सिद्धार्थ मोठा झाल्यावर त्याचे लग्न यशोधरा हिच्याशी लावून दिला. नंतर यांना एक पुत्ररत्न झाले व त्याचे नाव राहुल ठेवण्यात आले. एके दिवशी सिद्धार्थ राजवाड्याबाहेर पडला आणि त्याने एक अंतयात्रा, रोग झालेली व्यक्ती आणि वृद्ध व्यक्ती बघितली. या प्रसंगामुळे त्याला जीवनाचे नश्वरत्व कळाले. पुन्हा राजवाड्यामध्ये आल्यानंतर त्याने सर्व भौतिक सुखांचा, वैभवाचा त्याग करायचे ठरवले. वयाच्या २९ व्या वर्षी, एका रात्री आपल्या घोड्यावर बसून सिद्धार्थ राजवाड्याबाहेर पडला. त्याच्या ह्या क्रियेला महाभिनिष्क्रमण म्हणतात.

ऐहिक सुखाचा त्याग करण्यासाठी सिद्धार्थने कडक मार्गांचा अवलंब केला. आत्मक्लेश करण्यासाठी अन्नपाण्याचा ही त्याने त्याग केला. या मुळे त्याचे शरीर क्षीण होत गेले. ह्या मार्गाने ज्ञानप्राप्ती होणार नाही याचा अंदाज सिद्धार्थला आला व त्याने ध्यानाचा मार्ग निवडला. शरीर हे एक साधन आहे ते नाकारून चालणार नाही. म्हणूनच त्याने मध्यममार्ग निवडला व त्या गावातील सुजाता नामक स्त्री कडून शरीराला आवश्यक तेवढेच अन्न म्हणजेच दुध, खीर घेऊ लागला. बोधगया येथील पिंपळाच्या झाडाखाली बसून, जो पर्यंत ज्ञानप्राप्ती होत नाही, तोपर्यंत उठायचेच नाही असा निश्चय करून ध्यानधारणेला बसला. ४९ दिवसांच्या या तपश्चर्येनंतर ३५ व्या वर्षी सिद्धार्थला ज्ञानप्राप्ती झाली. इथून पुढे तो बुद्ध म्हणून जगविख्यात झाला.

अश्या ह्या ज्ञानी बुद्धांनी सारनाथ येथे आपले पहिले प्रवचन दिले, त्यालाच धम्मचक्रप्रवर्तन असे म्हणतात. या प्रवचनात त्यांनी बौद्धधर्माची मूलतत्वे सांगितली. अशी अनेक प्रवचने दिल्यानंतर गौतम बुद्धांना अनेक शिष्य मिळाले आणि या सर्व शिष्यांच्या मदतीने गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माचा सर्वत्र प्रसार केला. भगवान बुद्धांनी आपल्या पाली भाषेतील प्रवचनात ४ आर्य सत्य, अष्टांगिक मार्ग व पंचशील तत्वांचा अर्थ सामन्य लोकांना सोप्या पद्धतीने समजावून सांगितला.

कालांतराने भगवान बुद्धांनी धर्म प्रसाराकरिता बौद्ध संघ निर्माण केला. सुरुवातीला त्यामध्ये स्त्रियांना बंदी होती. मात्र गौतम बुद्धांचा शिष्य आनंद यांच्या विनंती नंतर स्त्रीयांनाही संघात प्रवेश मिळाला. इसवीसनपूर्व ४८३ साली, कुशीनगर येथे गौतम बुद्धांचे वयाच्या ८० व्या वर्षी महापरिनिर्वाण झाले.

*चार आर्य सत्य*

*१) दुःख :* मानवी जीवन हे दुःखमय आहे.
*२) तृष्णा :* मनुष्याच्या न संपणाऱ्या इच्छा हे दुःखाचे कारण आहे.
*३) दुःख निरोध :* दुःखाचे निराकरण वा अंत सर्व प्रकारची आसक्ती सोडण्याने होतो.
*४) प्रतिपद् :* दुःख निवारण्यासाठी सदाचाराचा मार्ग (अष्टांग मार्ग) आहे.

● *अष्टांगिक मार्ग :*

*१) सम्यक् दृष्टी :* निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे.
*२) सम्यक् संकल्प :* म्हणजे योग्य निर्धार, विचार.
*३) सम्यक् वाचा :* करुणायुक्त व सत्यपूर्ण वाचा (बोल) ठेवण्याचा प्रयत्‍न करणे.
*४) सम्यक् कर्मान्त :* उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्ये करणे.
*५) सम्यक् आजीविका :* वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता ती सन्मार्गानेच करणे.
*६) सम्यक् व्यायाम :* वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे.
*७) सम्यक् स्मृती :* तात्त्विक गोष्टींचे स्मरण करून चित्तास (मनाला) जागृत ठेवणे.
*८) सम्यक् समाधी :* कोणत्याही वाईट विकारांचा स्पर्श होऊ न देता दुष्ट प्रवृत्तींपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे

● *पंचशील तत्वे*

*१)* मी जीव हिंसेपासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
*२)* मी चोरी करण्यापासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
*३)* मी कामवासनेच्या अनाचारापासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
*४)* मी खोटे बोलण्यापासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
*५)* मी मद्य, मादक गोष्टी तसेच इतर मोहांत पाडणाऱ्या सर्व मादक वस्तूंच्या सेवनापासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.

● *दहा पारमिता*

*१)* शील पारमिता
*२)* दान पारमिता
*३)* उपेक्षा पारमिता
*४)* नैष्कम्य पारमिता
*५)* विर्य पारमिता
*६)* शांती पारमिता
*७)* सत्य पारमिता
*८)* अधिष्ठान पारमिता
*९)* करूणा पारमिता
*१०)* मैत्री पारमिता