ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ऑनलाईन संवाद

लॉकडाऊन काळातील मोबाईल रिटेलर्सच्या विविध समस्या, ई-कॉमर्स कंपन्यांच्या नियमबाह्य विक्रीकडे मोबाईल असोसीएशनने वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्षमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मोबाईल रिटेलर्सच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सकारात्मक प्रतिसाद

83

 

अकोट ता.23 : करोनाच्या वाढता प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात तब्बल दीड महिन्यापासून ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध लागू आहेत. अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तू सेवा वगळता अन्य सर्व व्यापार बंद आहे. सरकारच्या नियमावलीला राज्यातील सुमारे १५ हजार मोबाईल रिटेलर्सनेही प्रतिसाद देत व्यवहार बंद ठेवले आहेत. परंतु या काळात विदेशी ई-कॉमर्स कंपन्या ( फ़्लिपकार्ट आणि अमझोन ) शासनाच्या नियमांना बगल देत सर्रास इतर वस्तू विक्री करत आहेत. या नियमबाह्य प्रकारांना आळा बसण्यासाठी कडक पावलं उचलावीत अशी मागणी ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
लॉकडाऊन काळातील विविध समस्या मांडण्यासाठी असोसिएशनच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी असोसिएशनचे संस्थापक चेअरमन कैलाश लखयानी, राष्ट्रीय अध्यक्ष अरविंदर खुराणा, वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष विभूति प्रसाद, राष्ट्रीय सरचिटणीस भावेश सोळंकी, सहसचिव नवनीत पाठक, असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष अजित जगताप, राज्य सरचिटणीस जुझेर ढोरजीवाला,राज्य उपाध्यक्ष संजय विरवाणी आदींसह असोसिएशनचे पदाधिकारी चर्चेत सहभागी झाले होते.

अजित जगताप यांनी सुरूवातीलाच करोना महामारी थोपविण्यासाठी राज्य सरकार युद्ध पातळीवर करीत असलेल्या प्रभावी उपाययोजना व रूग्णसंख्येत झालेली घट याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करीत मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र लवकरच करोनावर मात करेल असा विश्वास व्यक्त केला. जगताप यांनी महाराष्ट्रातील मोबाईल रिटेलर्सनी ब्रेक द चेन निर्बंधांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत अतिशय जबाबदारी पूर्वक नियमावलीचे पालन केल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिले.

विभूति प्रसाद यांनी मोबाईल रिटेलर्सच्या समस्या मांडताना सांगितले की, महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लागू करताना सरकारने ई कॉमर्स कंपन्याना फक्त जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्याची परवानगी दिली आहे. मात्र अनेक विदेशी कंपन्या मोबाईल तसेच इतर वस्तुंची सर्रास विक्री करत आहेत. रिटेलर्स प्रामाणिकपणे नियम पाळत असताना या कंपन्या नियम पायदळी तुडवून विक्री करतात. यामुळे रिटेलर्सचे मोठं नुकसान होत असून सरकारने याबाबतीत कठोर पावलं उचलली पाहिजेत अशी आग्रही मागणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या गोष्टीची गंभीर दखल घेत संबंधित विभागाला माहिती घेऊन नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.
सध्या मोबाईल दुकाने बंद असल्याने या काळात वीज बिलांच्या स्थिर आकारात सवलत मिळावी, लॉकडाऊन संपुष्टात आल्यानंतर ग्राहकांना निर्धोकपणे दुकानात येऊन खरेदी करता यावी यासाठी व्यावसायिक व त्यांच्या कडील कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे, असोसिएशनच्या विविध समस्या सरकारकडे मांडण्यासाठी व सोडवण्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करण्यात यावा अशा मागण्या मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कडे करण्यात आल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असोसिएशनच्या वतीने करण्यात आलेल्या विविध मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. राज्यात सर्वच घटकांचे जलद लसीकरण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. तसेच व्यापारी वर्गाला दिलासा देणारे निर्णय घेण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. असोसिएशनच्या मागणी नुसार नोडल अधिकारी नियुक्त करण्याची कार्यवाही तात्काळ केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी करोना महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवणे, मास्कचा वापर, सॅनिटाजरचा वापर याविषयी प्रत्येक रिटेलर्सने स्वतः तसेच ग्राहकांमध्ये जनजागृती करावी असे आवाहन केलं. येत्या काळात जास्तीत जास्त मोबाईल रिटेलर्स बरोबर झूम मिटींगद्वारे संवाद साधायला आवडेल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या चर्चेतून अनेक महत्त्वपूर्ण विषयांची मुख्यमंत्री ठाकरे यांनी गांभीर्याने दखल घेत तातडीने पावले उचलल्याने असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

भावेश सोळंकी यांनी या मिटींगसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवर्जून वेळ देत असोसिएशनच्या समस्यांची आस्थेवाईकपणे नोंद घेतल्याबद्दल आनंद व्यक्त करीत आभार मानले.अशी माहिती उपाध्यक्ष संजय विरवाणी यांनी दिली