खुद्द!…ठाणेदाराने तीन लाच देणाऱ्यांना पकडून दिले

180

 

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी

अकोला : अवैध धंदे सुरु ठेवण्यासाठी 50 हजारांचे आमिष दाखवणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. ठाणेदाराला पहिल्या हप्त्याची 25 हजाराची रक्कम देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी (दि.22) पहाटे तिघांना रंगेहाथ पकडले. पोलिसांनी लाच मागितल्याचे अनेकवेळा ऐकले असेल. पण या प्रकरणात ठाणेदारानेच लाच देणाऱ्यांना पकडून दिले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच देणाऱ्या तिघांना अटक केली आहे.

दहीहांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत देशी व विदेशी दारुची अवैध विक्री करु देणे तसेच जुगार व वरली अड्डे चालू करण्यासाठी दहीहांडाचे ठाणेदार प्रकाश अहिरे यांनी परवानगी द्यावी, यासाठी त्यांना 50 हजार रुपयांच्या लाचेचे आमिष दाखवण्यात आले. त्यापैकी 25 हजार रुपयांची लाच देत असताना तिघांना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी पहाटे चारच्या सुमारास रंगेहाथ पकडले. या कारवाईने पोलीस दलात एकच खळबळ उडाली. हा रिव्हर्स ट्रॅप असल्याची माहिती समोर येत असून राज्यातील हा दुर्मिळ ट्रॅप असल्याची चर्चा आहे. अकोला जिल्ह्यातील हा दुसरा रिव्हर्स ट्रॅप असल्याची माहिती मिळत आहे.

दहीहांडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश अहिर यांनी पदभार स्विकारल्यानंतर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जुगार माफियांनी अवैध धंदे सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. अहिर यांना देशी व विदेशी दारू तसेच जुगार अड्डे सुरु करण्यासाठी पैशांचे आमिष दाखवले. मात्र, अहिर यांना हे पटणारे नसल्याने त्यांनी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तसेच त्यांच्यावर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. अहिर यांनी तक्रार दिल्यानंतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी 20 आणि 21 मे रोजी पडताळणी केली.

यावेळी शिवा गोपाळ मगर (वय-30) अभिजित रविकांत पागृत (वय31) आणि घनश्याम गजानन कडू हे तिघे 50 हजार रुपये लाच देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समोर आले. त्यानंतर 25 हजार रुपयांचा पहिला हप्ता घेऊन हे तिघे शनिवारी पहाटे दहीहांडा पोलीस ठाण्यात पोहचले. यावेळी सापळा रचून असलेल्या अधिकाऱ्यांनी तिघांना रंगेहाथ पकडले. तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिघांना 24 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.