एम स्पोर्ट्स फाऊंडेशनने दिला अनेक कुटुंबांना मदतीचा हात

125

 

दिलीप अहिनवे
मुंबई महानगर प्रतिनिधी
‘दखल न्युज भारत’

ठाणे, दि. २२ : गेल्या वर्षभरापासून भारतावर कोरोनाचे संकट ओढवलेले आहे. या महामारीमुळे अनेक कुटुंबांची वाताहात झाली. अशा प्रतिकुल परिस्थितीत गरजु लोकांपर्यंत पोहोचुन त्यांना वेगवेगळ्या प्रकारची मदत ठाणे येथील एम स्पोर्ट्स फाऊंडेशनने केली. संस्थेच्या माध्यमातून गरजु कुटुंबांना जणू आशेचा नवीन किरण दिसू लागला आहे.

एम स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष अजित कुलकर्णी हे क्रीडाक्षेत्रातील नामांकित ॲथलेटिक्स प्रशिक्षक आहेत. आजतागायत त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवले आहेत. तरी देखील मागील वर्षापासून अनेक कुटुंबांना मदत करुन उत्तमप्रकारे सामाजिक बांधिलकी त्यांनी जपली आहे. संकटकाळात गरजु लोकांच्या मदतीला धावून जाऊन त्यांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श तयार केला आहे.

गेल्या वर्षभरात १५०० पेक्षा जास्त आदिवासी कुटुंबांना मोफत धान्य वाटप केले. तेवढ्यावरच न थांबता या संस्थेने कम्युनिटी किचन सुरु केले. सलग ४० दिवस सातशे ते आठशे लोकांना एका वेळेचे जेवण पुरविण्यात आले.

लॉकडाऊन कालावधीत कामधंदे बंद झाल्यामुळे हजारो मजुर आपापल्या गावी पायी चालत गेले. अशा लोकांसाठी ठिकठिकाणी ताक, पाणी बाटल्या व उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून टोप्यांचे वितरण करण्यात आले.

अहोरात्र जनतेसाठी झटणाऱ्या झोन ५ मधील ८ पोलीस स्टेशनमध्ये जवळपास दहा हजार पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे दर दिवसाआड आदिवासी पाड्यात जाऊन ५० कुटुंबांना किराणा मालाचे वाटप करण्यात आले.

लॉकडाऊन कालावधीत शाळा बंद परंतु शिक्षण सुरु होते. अनेक ठिकाणी ऑनलाईन तर काही ठिकाणी ऑफलाईन शिक्षण सुरु होते. आदिवासी गावांमध्ये सुविधे अभावी ऑनलाईन शिक्षणाला फटका बसत होता. संस्थेने शहापूर तालुक्यातील ३ आदिवासी शाळांना ५५ टॅबचे वाटप केले. अनेक शाळांना तसेच मुलांना जवळपास ८ हजार वह्यांचे वाटप केले.

आत्ताच येऊन गेलेल्या तौकाते चक्रीवादळाचा तडाखा अनेक आदिवासी गावांना बसला. बऱ्याच घरांचे पत्रे, कौले व छप्पर उडाले. अशा गरजु कुटुंबांना संस्थेने नवीन सिमेंटचे पत्रे पुरवले. अजुन बऱ्याच कुटुंबांना मदत करणे सुरुच आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अजित कुलकर्णी व त्यांचे चिरंजीव अभिषेक कुलकर्णी यांनी दिली.