आळंदीतील घरकुल लाभार्थ्यांना उर्वरित अनुदान द्यावे – माजी नगरसेवक घुले यांची मागणी

65

आळंदी : येथील आळंदी नगरपरिषद हद्दीतील नागरिकांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून घरकुल अनुदान योजना राबविली जात आहे. मात्र मंजूर घरकुल अनुदान वेळेवर मिळत नसल्याने घरकुल लाभार्थ्यांना उर्वरित अनुदान तात्काळ देण्याची मागणी माजी नगरसेवक दिनेश घुले यांनी केली आहे.

या संदर्भात आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव यांना निवेदन देवून त्यांचे लक्ष वेधले असल्याचे माजी नगरसेवक घुले यांनी सांगितले. घरकुल साठी तात्काळ डी.पी.आर मंजूर करण्याची मागणी देखील करण्यात आली असून २ लाख ६७ हजार रुपये अनुदान दिले जात असून सुमारे १ लाख रुपये मंजूर घरकुल धारकांचे केंद्र शासनाचे अनुदान मिळाले नसल्याने तात्काळ देण्याची मागणी केली आहे. घरकुल अनुदान हे टप्प्या टप्प्याने देण्यात येत असून सुरूवातीला वेळेवर अनुदानाचे हप्ते मिळाले. मात्र सदर हप्ते व टप्पे निहाय अनुदान विहित वेळेत मिळत नसल्याने लाभार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यापूर्वीचे मंजूर घरकुल लाभार्थ्यांचे उर्वरित अनुदान देवून घरकुल साठीचा डी .पी.आर तात्काळ मंजूर करण्याची मागणी घरकुल लाभार्थ्यांचे वतीने करण्यात आली आहे.