मुरबाड शासकीय कोविड रुग्णालयाचा अजब अनागोंदी कारभार! मनसे विद्यार्थी सेनेने उठविला आवाज! दाखल केली तक्रार ! “कोरोना रुग्णांची हेळसांड सहन केली जाणार नाही” संध्या चौधरी या महिलेला न्याय द्यावा” आरोग्य प्रशासनाला भरला सज्जड दम! अन्यथा मनसे विद्यार्थीसेना तीव्र आंदोलनाच्या पावित्र्यात!

154

मुरबाड / प्रतिनिधी:३१.(सुभाष जाधव)

मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात उदघाटन झालेल्या मुरबाड शहरातील शासकीय कोविड रुग्णांलयाने सध्या अनागोंदी व मनमानीपणाचा कळसच चढविला आहे . शासकीयपणाचा केवळ देखावा करून “आतून कीर्तन वरून तमाशा” याप्रमाणे मुरबाड तालुक्यातील अनेक रुग्णांच्या अनुभवानुसार सोयी सुविधांचा बोजवारा निर्माण केला आहे .अनेक रुग्णांनी रुग्णालयातूनच या शासकीय कोविड रुग्णालयाच्या आतमध्ये चालणाऱ्या मनमानी बाजाराचा व कोविड रुग्णांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करण्याच्या काळ्या प्रकाराचा पर्दाफाश केला आहे . याबाबत नुकतच मुरबाड शहर मनसे विद्यार्थी संघटनेने तालुका आरोग्य अधिकारी , पंचायत समितीचे सभापती , पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व आरोग्य प्रशासनाकडे तक्रार करून दाद मागितली आहे. दिवसाढवळ्या व रात्रीही अनेक दाखल केलेल्या रुग्णांना विविध सोयी सुविधा पुरविण्याचा फक्त बेबनाव या शासकीय कोविड रुग्णालयाकडून केला जातो मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी दाखल केलेल्या रुग्णांकडे कानाडोळा केला जातो . याबाबतचा एक अमानुष प्रकार समोर आला आहे. सरळगाव येथे राहणाऱ्या संध्या चौधरी यांचा १५ जुलै रोजी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आला सदर महिलेला याच दिवशी संध्याकाळी ७ वाजता या रिपोर्ट बाबत कळविले. त्याप्रमाणे त्यांना मुरबाड येथे आणण्यासाठी मुरबाड शासकीय रुग्णालयाची रुग्णवाहिका जाणे गरजेचे होते, मात्र या दिवशी रात्री १० वाजेपर्यंत त्यांना सरळगाव येथे रुग्णवाहिकेसाठी ताटकळत राहावे लागले. सदर महिलेला सरळगाव येथे पॅथॉलॉजी लॅब येथे रक्ततपासणीचे काम करताना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न घाबरता गेली अनेक वर्षे त्या या पॅथॉलॉजी लॅबमध्ये जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा करत आहेत . १५ जुलै रोजी सिव्हिल हॉस्पिटल येथे नेण्यासाठी रात्री १० वाजल्यानंतर रुग्णवाहिका त्यांना घेऊन जाण्यासाठी आली. “त्या जास्त आजारी असल्यामुळे मुरबाडच्या शासकीय कोविड रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करता येणार नाहीत” असे या रुग्णालायतील आरोग्य प्रशासन व तेथील डॉक्टरांचे मत होते . म्हणून त्यांना ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले. सिव्हिल रुग्णालयात त्यांच्यावर चांगले उपचार करण्यात आले. २ ते ३ दिवसात संध्या चौधरी यांना सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टरांनी सुट्टी देऊन” तुम्हाला १० दिवस अंबरनाथ येथील रुग्णालयात विलगिकरण कक्षात राहावे लागेल”असे सांगितले. सदर महिलेने “मला अंबरनाथ ऐवजी मुरबाड येथे विलगिकरण कक्षात ठेवावे” अशी विनंती केली. या महिलेने फोनाफोनी करून सिव्हिल रुग्णालतातून मुरबाड येथे जाण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलला विनंती केली. त्यानुसार संध्या चौधरी यांना ठाणे येथून मुरबाड येथे जाण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलने रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. मुरबाड येथे दाखल झाल्यानंतर मात्र मुरबाड शासकीय रुग्णालयाने कळसच केला. कोणत्याही प्रकारची सेवा- सुविधा या महिलेबरोबरच अन्य रुग्णांनाही मिळत नव्हती . रुणांना पिण्यासाठी गरम पाणी दिले जात नव्हते , कधी कधी रुग्णांना व सदर महिलेला स्वत:च स्वताचे जेवण वाढून घ्यावे लागले, अंघोळीची अत्यंत वाईट अवस्था, याबाबत या महिलेला येथे अत्यंत वाईट अनुभव आला. कोणत्याही प्रकारचा बॉण्ड पेपर लिहून न घेता मुरबाड शासकीय कोविड रुग्णालयाच्या प्रशासनाने या महिलेच्या पती व दोन मुलांना ‘पशेनी’ येथे कोरोन्टाईन केले की, ज्या ठिकाणी सदर कोरोन्टाईन सेंटर हे गटविकास अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली असतानाही येथे अत्यंत गचाळ कारभार संध्या चौधरी हिच्या कुटुंबाला दिसून आला. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी इकडे कानाडोळा करतात की काय? असा अनुभव ‘पशेनी’ येथे होम कोरोन्टाईन होणाऱ्या रुग्णांना येतो .सदर महिलेला जाणून बुजून त्रास देण्याचा धक्कादायक प्रकार मुरबाड शासकीय कोविड रुग्णालयात घडला. मला न्याय मिळावा अशी कैफियत मांडून सदर महिलेने महाराष्ट्र नवनिर्माण सेना विदयार्थीसेना यांच्याकडे याबाबत तक्रार केली . यासंदर्भात नुकतच मनसे विद्यार्थीसेना यांनी पंचायत समितीचे सभापती महोदय श्रीकांत धुमाळ , गटविकास अधिकारी रमेश अवचर व तालुका अरोग्य अधिकारी श्रीधर बनसोडे यांना निवेदन देऊन झाल्या प्रकाराबाबत मुरबाडच्या शासकीय कोविड हॉस्पिटल प्रशासनाने व आरोग्य प्रशासनाने संध्या चौधरी या महिलेची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे. मुरबाडच्या शासकीय कोविड हॉस्पिटलमध्ये मुरबाड तालुक्यातील अनेक रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. येथे नेमणूक केलेले वॉर्डबॉय कामात चालढकल करतात , रुग्णाचे तापमान पाहिल्यानंतर सदर रुग्णाला तापमान किती आहे हे सांगितले जात नाही, अनेक रुग्णांना जुनेच मास्क वापरावे लागतात , गरम पाणी मिळत नाही , तेव्हढे येथील डॉक्टर फक्त राउंड मारतात, काउंटरवर जाऊन कोरोना रुग्णांना जेवण स्वताच्या हाताने घ्यावे लागते, सॅनिटायझरची व्यवस्था केली जात नाही ,वॉर्डबॉय आळशीपणा करतात , येथील आरोग्य प्रशासन अनेक रुग्णांना घाबरविण्याचे काम करते , रुग्णांना धीर देण्याऐवजी त्यांचे मानसिक खच्चीकरण मुरबाच्या शासकीय कोविड हॉस्पिटलमध्ये केले जाते , वेळेवर रुग्णवाहिकेची व्यवस्था होत नाही . “असे प्रकार यापुढे खपविले जाणार नाहीत, या रुग्णालयात दाखल होणाऱ्या मुरबाड तालुक्यातील प्रत्येक कोरोना रुग्णाला परिपूर्ण सेवा मिळालीच पाहिजे” असा इशारा मनसे विद्यार्थीसेनेने दिला आहे. या रुग्णालयात नेमणूक केलेले डॉक्टर, परिचारिका,वॉर्डबॉय यांना महाराष्ट्र शासनाकडून पगार मिळणार आहे तर मग कोरोना रुग्णांच्या बाबत ही दिरंगाई का केली जाते? असा असा सवाल मनसे विद्यार्थीसेनेने मुरबाडच्या आरोग्य प्रशासनाला विचारला आहे. पुढील दिवसांत जर “मुरबाड तालुक्यातील कोरोना रुग्णांना सेवा सुविधा मिळत नाही “अशी तक्रार आली तर मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा विद्यार्थी सेनेचे मुरबाड शहर अध्यक्ष देवेंद्र जाधव यांनी आरोग्य प्रशासनाला दिला आहे. यावेळी प्रभाग क्रमांक १६ चे शाखाध्यक्ष उमेश सोनावणे, प्रभाग क्रमांक १४ चे शाखाध्यक्ष ऋषिकेश तेलवणे , प्रभाग क्रमांक १५ चे शाखाध्यक्ष अजय यशवंतराव, तसेच गिरीश यशवंतराव, किशोर सुरोशे , हर्षल यशवंतराव, राकेश घरत, अक्षय वाकचौडे, विकास यशवंतराव, मयूर घरत, अजित पानसरे, सिद्धेश रोठे, प्रभाकर सुरोशे आदी मनसैनिक उपस्थित होते.