आळंदीसाठी कोरोणा लसीचा साठा वाढवून द्या – नगराध्यक्षा उमरगेकर यांची पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

40

आळंदी : कोरोना लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यासाठी मुबलक प्रमाणात लस उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे आहे, त्याचप्रमाणे आळंदी शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करण्याची आवश्यकता आहे. परंतु लोकसंख्येच्या तुलनेत मिळणाऱ्या लसीचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता आळंदी साठी कोरोना प्रतिबंधक लसींचा कोटा वाढवून मिळावा अशी मागणी आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी पुणे जिल्हाधिकारी राजीव देशमुख यांना केली आहे.
नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी निवेदनात म्हटले आहे की आळंदी शहर आणि आळंदी ग्रामीणची अंदाजे लोकसंख्या एक लाख असून पंचक्रोशीचा विचार केला तर ती दोन लाख पर्यंत आहे, हि सर्व लोकसंख्या आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या अखत्यारित येत असून त्यामुळे आळंदी ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण जास्त असल्याने त्याप्रमाणात आपण पाठविलेल्या लसींचे प्रमाण अत्यंत अल्प असल्याने सदर लसीकरण केंद्रावर नागरिकांची झुंबड उडत आहे त्यामुळे आळंदी शहरात करिता लोकसंख्येच्या प्रमाणात जास्तीत जास्त लसींचा पुरवठा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.