…पुन्हा वाघाच्या हल्ल्यात एक महिला ठार

वाघाचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी

367

 

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी

 

गडचिरोली, :- गडचिरोलीतील दिभना गावानजीकच्या जंगल परिसरात वंदना अरविंद जेंगठे (४०) या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले आहे. हि घटना काल सायंकाळ च्या सुमारास घडली आहे.

वंदना अरविंद जेंगठे या आपली मुलगी व गावातील ४ महिलांसोबत कुड्याचे फुल तोडण्यासाठी जंगलात गेले होते. या वेळी दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून तिला जागीच ठार केले. परंतु हि बाब सोबतच्या महिलांच्या लक्षात आली नाही. किंचित ओरडण्याचा आवाज आला. शहानिशा केल्यानंतर वाघाने वंदना यांच्यावर हल्ला केल्याचे महिलांच्या लक्षात आले. परंतु भीतीमुळे सर्व महिला गावाकडे आल्या व सर्व हकीकत गावकऱ्यांना सांगितली. त्यानंतर गावातील नागरिकांनी घटनास्थळी जाऊन बघितले असता वंदना जेंगठे मृतावस्थेत आढळून आली.

घटनेची माहिती वनविभागाला प्राप्त होताच पोर्लाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एम. पी. चांगले यांनी घटनास्थळी जाऊन सदर घटनेचा पंचनामा केला.

या घटनेमुळे दिभना परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. एकाच आठवड्यातील हि तिसरी घटना असून तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात अनेक महिलांना प्राण गमवावे लागले आहे. वन विभागाने वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा. अशी मागणी गावातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.