कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ घेणार! ‘एक हात शैक्षणिक मदतीचा’ या मोहिमेत सहभागी व्हावे- डी.टी. आंबेगावे यांचे आवाहन!

131

 

दिनेश बनकर
कार्यकारी संपादक
दखल न्यूज भारत

मुंबई : देशभरासह महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्यूचे तांडव निर्माण झाले असून ज्या विद्यार्थ्यांच्या आई वडिलांचा कोरोना विषाणूची लागण होऊन मृत्यू झाला आहे त्या विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये म्हणून पुढील शिक्षणाची जबाबदारी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य हा संघ घेणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांनी सांगितले आहे. आपल्या परिसरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबातील गरजू विद्यार्थ्यांची माहिती आम्हला द्यावी व दानशूर व्यक्तींनी या अनाथ मुलांना ‘एक हात शैक्षणिक मदतीचा’ देण्यासाठी 9270559092 / 7499177411 या नंबरवर संपर्क साधावा असे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी. आंबेगावे यांनी आवाहन केले आहे. आपण वह्या, पुस्तके, कपडे, बॅग, शैक्षणिक फी, कंपासपेटी, पेन-पेन्सिल,आर्थिक मदत यासह इतर काही मदत करु इच्छित असाल तर आपण पुढे येऊन छत्र हरवलेल्या विद्यार्थ्यांना मदतीची सावली द्यावी असे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आपणासआवाहन करीत आहे.
‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो कोणी प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही’ या उक्तीप्रमाणे अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देऊन अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी, स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी, स्वतःचा व पर्यायाने राष्ट्राचा विकास करण्यासाठी, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी, आर्थिक सामाजिक, शैक्षणिक, वैज्ञानिक विकास करण्यासाठी शिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे त्यामुळे शिक्षणापासून असा एकही विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने ‘एक हात शैक्षणिक मदतीचा’ ही मोहीम सुरू केली असून या मोहिमेत आपण सहभागी होऊन या अनाथ विद्यार्थ्यांना उद्याचा आदर्श नागरिक होण्यासाठी सहकार्य करूया असे डी. टी. आंबेगावे यांनी आवाहन केले आहे.