गोवळकोटचे नगरसेवक भगवान बुरटे यांचे निधन

93

 

चिपळूण (वार्ताहर)
चिपळूणतील गोवळकोटवासियांचे लाडके नेतृत्व व विद्यमान नगरसेवक भगवान कृष्णा बुरटे (५५) यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर गोवळकोट येथील स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने गोवळकोट-पेठमाप परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बांधकाम व्यावसायिक म्हणून अनेक वर्षे ते काम करीत होते. अनेक गोरगरीबांची घरकुल त्यांनी उभारली. या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी अनेक कुटुंबियांना मदतही केली. गावच्या प्रत्येक सामाजिक व धार्मिक कार्यात हिरहिरीने सहभाग घेणारे भगवान दादा हे अनेक वर्षे शिवसेना पक्षाच्या माध्यमातून राजकारणातही सक्रिय होते. नगर परिषद निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी व त्यांच्या सहकारी नगरसेविका सुषमा कासेकर यांनी अनेक कामांना गती दिली व पूर्णत्वास नेली. त्यांच्या या कार्याला आता पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होण्याआधीच त्यांची ‘एक्झिट’ अनेकांच्या मनाला चटका लावून गेली आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनाही या घटनेचा मोठा धक्का बसला आहे.
गेले काही दिवस येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचार सुरु असतानाच त्यांची प्रकृती खालावली आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, जावई, भाऊ असा परिवार आहे

दखल न्यूज भारत