तौत्के चक्रीवादळ : किनारपट्टीवरील अनेक गावांना सतर्कतेचा इशारा

110

 

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी

महाराष्ट्र:- अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवायला सुरुवात झाली आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

*तौत्के चक्रीवादळाचा परिणाम :*

रत्नागिरीत मध्यरात्री पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्या असून, तालुक्‍यातील 104 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सिंधुदुर्गात वादळाचे पडसाद उमटले असून, पहाटे 2 पासून जिल्ह्यात सोसाट्याचा वारा सुटला आहे. त्यामुळे रात्री 2 पासून जिल्ह्यातील बहुतांश भागातील वीज बंद करण्यात आली आहे.

मुंबईत कोरोना बाधित रुग्णांचे महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये सुरक्षितपणे स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच किनारपट्टी भागात वाऱ्यासह पाऊस पडतो आहे.

बिकेसी, दहिसर आणि मुलूंड येथील कोविड आरोग्य केंद्रांतील एकूण 580 कोविड बाधित रुग्णांचे महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये सुरक्षितपणे स्थलांतर केले आहे.

नाशिक जिल्ह्यातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नाशिक जिल्हा आपत्कालीन विभागानेही हाय अलर्टचा संदेश दिला आहे.

*गोवा आणि कर्नाटकात मोठे नुकसान :* गोव्यासह कर्नाटकातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक झाडे व विजेचे खांब उन्मळून पडले असून वादळाचा मोठा तडाखा बसला आहे. कर्नाटकात चार जणांचा मृत्यू झाला असून सहा जिल्ह्यांतील जवळपास ७३ गावांना झोडपून काढले आहे. हे वादळ आता गुजरातच्या दिशेने पुढे सरकत आहे.

*केरळमध्ये हाहाकार :* केरळमध्ये काही भागात पाणी तुंबले असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी सुरु आहे. तिरुअनंतपुरम मधील गावांत किनाऱ्याजवळील घरांचे मोठे नुकसान झाले आहे.

सध्या हे चक्रीवादळ प्रतितास १२० किलोमीटर वेगाने वारे वाहत असून उद्या गुजरात किनारपट्टीला धडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील १२ तासांत वादळाची तीव्रता आणखी वाढण्याची भिती हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी गुजरातसह महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची संवाद साधता आवश्यक सुचना दिल्या.