आरमोरी तालुक्यातील देलनवाड़ीत पानी समस्या गंभीर

136

 

 

अश्विन बोदेले
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत

 

आरमोरी : तालुक्यातील देलनवाडी येथे गेल्या दोन महिन्यापासून नळाला बरोबर पाणी येत नसल्याने गावात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे गावातील पाणी समस्या तत्काळ निकाली काढा, नाहीतर गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करा, अशी मागणी पंचायत समिती सदस्य किरण म्हस्के व गावकऱ्यांनी केली आहे.
देलनवाडी हे परिसरातील मध्यवर्ती ठिकाण आहे. या गावात विविध शासकीय कार्यालये आहेत. गावात जीवन विकास प्राधिकरण अंतर्गत नळ योजना कार्यान्वित झाली आहे. मात्र गेल्या दोन महिन्यापासून नळाला बरोबर पाणी येत नसल्याने गावात पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याचा वापर व गरज वाढली आहे. नळ योजना असूनही पाणी येत नसल्याने लोकांना पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे.
आता तेंदूपत्ता हंगाम सुरू आहे. त्यामुळे लोक जंगलातून तेंदूपाने गोळा करून आणल्यानंतर त्यांना भर उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या अंगाची लाही-लाही होत आहे. मात्र याकडे ग्रामपंचायत सचिवाचे दुर्लक्ष होत आहे.
– तर ट्रॅॅक्टरने पाणीपुरवठा करा
देलनवाडी येथे ऐन उन्हाळ्यात उद्भवलेली पाणी समस्या तत्काळ निकाली काढा, अन्यथा ट्रॅकरद्वारे गावात पाणीपुरवठा करा, अशी मागणी पंचायत समिती सदस्य किरण मस्के, दिगेश्वर धाईत, कामराज हर्षे, विठ्ठल गेडाम, नितीन नवहाते, शालिनी भांडारकर, सिंधू घोडमारे, ज्योती घोडमारे, रेखा धात्रक, कुंदा घोडमारे, मंदा धाईत आदींनी केली आहे.