गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी व टाळेबंदीत 1 जुन पर्यंत वाढ बाहेर राज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांना व माल वाहतूकदारांना कोरोना चाचणी अनिवार्य आठवडी बाजारांसह दैनंदिन गुजरी भरविण्यास मनाई

या पुर्वी कोरोना विषयक दिलेल्या सुचनांचे पालन करणे आवश्यकजिल्ह्यातील रास्त भाव दुकाने सकाळी 7.00 ते सायंकाळी 5.00 वा पर्यंत सुरू राहणार

128

 

संपादक जगदीश वेन्नम

गडचिरोली, दि.14 मे, (जिमाका) : राज्य शासनाने दि.12 मे रोजी दिलेल्या आदेशांच्या धर्तीवर व जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती पाहता जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्हयातील जमावबंदी व टाळेबंदीत 1 जुन 2021 सकाळी 7.00 वा. पर्यंत वाढ केली आहे. याबाबत त्यांनी लेखी आदेश निर्गमित केले आहेत व सदर आदेश दि.15 मे 2021 पासून लागू होणार आहेत. यामध्ये बाहेर राज्यातून कोणीही व्यक्ती येत असल्यास त्याला मागील 24 तासातील नकारात्मक आरटीपीसीआर चाचणी सोबत असणे अनिवार्य केले आहे. तसेच बाहेर राज्यातून येणाऱ्या माल वाहतूकदार गाडी चालक व सोबत एक व्यक्ती यांनाही नकारात्मक आरटीपीसीआर चाचणी सोबत असणे अनिवार्य असणार आहे. जिल्ह्यातील आठवडी बाजार व दैनंदिन गुजरी भरविण्यासही सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी कोविड 19 बाबत शासननाने दिलेल्या निर्णयांचे पालन करणे आवश्यक आहे. आत्यावश्यक सेवेमधील दूध संकलन, वाहतूक, वितरण सुरळीतपणे सुरू ठेवता येईल असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

29 एप्रिल रोजी कोरोना विषाणूच्या प्रसारावर अंकुश लावण्यासाठी हे निर्बंध दि.15 मे पर्यंत लागू करण्यात आले होते, तसेच नवीन मार्गदर्शक तत्वेही जाहीर करण्यात आले होते. आता हे निर्बंध 1 जून रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत कायम असतील. साथरोग अधिनियम-1897, तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या तरतुदी अनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या पत्रकात म्हटले आहे की, ‘ब्रेक दि चेन’ संबंधी 13 एप्रिल 2021, 21 एप्रिल 2021 व तद्नंतर 29 एप्रिल 2021 रोजी घोषित केलेले सर्व निर्बंध 1 जून 2021 पर्यंत लागू राहतील. त्या व्यतिरिक्त वरील निर्बंधही लागू करण्यात आले आहे. यापूर्वी 18 एप्रिल आणि 1 मे 2021 रोजी जाहीर केलेल्या निर्बंधांमध्ये महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या संवेदशील भागातील व्यक्तींसाठी असलेले नियम आता देशाच्या कोणत्याही भागातून महाराष्ट्रामध्ये दाखल होणाऱ्या व्यक्तींसाठी लागू राहतील.

*रास्त भाव दुकाने सकाळी 7.00 ते सायंकाळी 5.00 वा पर्यंत सुरू* : गडचिरोली जिल्हयातील सर्व रास्त भाव दुकाने सकाळी 7.00 ते सायंकाळी 5.00 वा पर्यंत सुरू राहणार आहेत. सदर रास्त भाव दुकानदारांना जिल्हयातील पात्र शिधापत्रकधारांना, लाभार्थी यांना अन्नधान्य नियमितपणे वितरण करण्याचे स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात आले आहे. यादरम्यान संबंधितांनी प्रशासनाकडून दिलेल्या कोविड संसर्गाबाबतच्या उपाययोजना व नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.