वडेगाव रेल्वे येथे आढळले 2 कोरोना रुग्ण एसडीएमच्या आदेशाने गावाच्या सीमा सील

163

 

बिंबिसार शहारे/राहुल उके
प्रतिनिधी दखल न्युज भारत

अर्जुनी मोरगाव,दि.31ःतालुक्यातील वडेगाव रेल्वे येथील दोन व्यक्ती कोरोना बाधीत आढळल्याने आज 31 जुलै रोजी गावाला कंटेनमेंट झोन जाहिर करुन गावाच्या सर्व सीमा उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांच्या आदेशाने सील करण्यात आलेल्या आहेत. तालुक्यात आता कोरोना बाधितांची संख्या तीन झाली आहे .
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वडेगाव रेल्वे येथील दोन व्यक्ती 25 जुलै रोजी सायंकाळी ओडीसा राज्यातून स्वतःच्या खाजगी वाहनाने प्रवास करून घरी आले. त्यांना 25 ते 28 जुलै पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडेगाव रेल्वे येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यानंतर सदर दोन्ही व्यक्तीस 28 जुलैला कोविड केअर सेंटर नवेगावबांध येथे चाचणी करता नेण्यात आले असता सदर व्यक्तींचे अहवाल 30 जुलै रोजी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे वडेगाव रेल्वे या गावास कोरोना आजाराच्या प्रतिबंधाकरीता येणारे व जाणारे सर्व मार्ग तात्काळ प्रभावाने बंद करून आवागमन बंद करण्यात आले आहे. कन्हाळगाव, बुधेवाडा, घाटी पळसगाव ही गावे बफर झोनमध्ये मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. आज 31 जुलैला अर्जुनी मोरगावच्या उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी वडगाव रेल्वे गावाला भेट देत ग्रामपंचायत कार्यालयात पदाधिकारी व यंत्रणेची बैठक घेत कोअर झोनमध्ये करण्यात येणाऱ्या उपाययोजना विषयी मार्गदर्शन केले. यावेळी अर्जुनी मोरगावचे तहसीलदार विनोद मेश्राम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय राऊत, खंडविकास अधिकारी मयूर आंदेलवाड, अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तोंदले तसेच सरपंच ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, तलाठी व गाव समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.