” लॉकडाऊन पे लॉकडाऊन “

119

 

लेखन – विशाल मोरे

जागतिक कोरोना विषाणूंच्या महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन’ लॉकडाऊन पे लॉकडाऊन ‘ धोरणं सातत्याने आखत आहे. देशभरात कोरोनाने अक्षरशः हाहाकार माजवला असून याला लगाम लावण्यासाठी केवळ शासन, प्रशासन आणि कोविड योद्ध्यांनी ही लढाई लढून चालणार नाही तर लोकसहभागाच्या माध्यमातून लोकचळवळ उभारणे अत्यंत गरजेचे आहे. वाड्या-वस्त्यांवर,गाव,समाज, तालुका, जिल्हास्तरावर या संसर्गजन्य साथी विरोधात शासकीय नियमांचे काठेकोरपणे पालन करणे महत्त्वाचे आहे. कोरोनाला हरवण्यासाठी खासगी,सरकारी आणि आरोग्य व्यवस्था अक्षरशः हतबल झाली आहे.
असे असताना एकीकडे पोटाची खळगी भरण्यासाठी सर्वसामान्य तारेवरची कसरत करताना दिसत आहे. लॉकडाऊन काळात अनेकांना आपल्या नोकऱ्या,छोटे मोठे उद्योग धंदे गमवावे लागले असताना कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा ? जगायचं की कोरोनाला घाबरुन घरातच उपासमारीने मरायचं हा प्रश्न हातावर पोट असलेल्यांना पडला आहे. शासकीय सेवेतील लोकांना सर्व मुभा द्यायच्या आणि सर्वसामान्य लोकांनी नियम पाळून घरी राहायचं ! का ? किती दिवस ? घरच्या कमवत्याच्या हाताला वर्षभर कामधंदा नसल्याने अनेकांची एकवेळची चूळ पेटणे जिकिरीचे झाले आहे. याकारणास्तव पोलीसांच्या जाचाला सामोरे जाऊन नाईलाजाने पोटाची खळगी भरण्यासाठी घराबाहेर सामान्यांना पडावे लागत आहे.
दुसरीकडे बड्या नेत्यांनी निवडणूका, प्रचार सभा, रँली,संमेलन, लग्न सोहळ्याच्या नावाखाली शासकीय नियमांची पायमल्ली करायची हे योग्य आहे का ? एखाद्या सामान्यांच्या घरातील सोहळ्यात ५० व्यक्तींचा नियम आणि नेत्यांच्या सोहळ्यात हजारोंची उपस्थिती ? आरोग्याच्या आणिबाणीत नियम हे सर्वांना सारखेच असायला हवेत.
तिसरीकडे कोरोना रोखण्यासाठी शासन आपल्या परीने जिवाचे रान करत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न व शासकीय यंत्रणा प्रभावीपणे राबवत आहे. विविध कठोर नियम जारी करत आहे, परंतु नागरिक या नियमांचे जाणीवपूर्वक पालन करताना दिसत नाही. दुसऱ्या लाटेबरोबर तिसरी लाटही येऊ घातली आहे. तरी देखील नागरिक सोशल डिस्टन्सिंग, सँनिटाईझर, मास्क, हँंडग्लोज चा वापर करत नसल्याने शासनाला ‘ लॉकडाऊन पे लॉकडाऊन ‘ निर्णय नाईलाजाने घ्यावा लागतो आहे.
*लेखन : विशाल मोरे*
*भ्रमणध्वनी – ७४००२६२१६०*
*( दाभीळ,दापोली )*