दोन वर्ष लोटूनही तेंदूपत्ता संकलन मजूर बोनस मिळण्याच्या प्रतीक्षेतच

70

सत्यवान रामटेके(देसाईगंज ग्रामीण तालुका प्रतिनिधी)
देसाईगंज तालुक्यात तेंदूपत्ता संकलन करण्याला नव्याने सुरुवात झाली आहे.मात्र दोन वर्षांपूर्वी संकलन केलेल्या तेंदूपत्ता मजुरांचे बोनस मिळाले नसल्याने मजूर वर्ग वनविभागाप्रति नाराजी व्यक्त करीत आहेत.
दरवर्षी मोठ्या प्रमाणावर तेंदूपत्ता गोळा करण्याला मे महिन्यात सुरुवात होत असते.सर्वसामान्य जनता जंगल परिसरातून तेंदू पाने तोडून उदरनिर्वाह करण्यासाठी धडपडत असतात.सध्या स्थितीत तेंदूपत्ता तोडण्याला तीन ते चार दिवसाचा कालावधी झाला असून तेंदूपत्ता गोळा करण्याचे काम सुरूच आहे.दरवर्षी तेंदूपत्ता गोळा करण्याच्या माध्यमातून लाखोंची उलाढाल केली जाते.यामध्ये पेसा अंतर्गत व नॉन पेसा अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारची मजुरी ठरवली जाते.मजुरीची रक्कम वेगळी व बोनसच्या माध्यमातून मिळणारी रक्कम वेगळी असते.गोणी नुसार तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या मजुरांना बोनसची रक्कम अदा केली जाते.मागील दोन वर्षात तेंदूपत्ता गोळा करून झाले व पानेही हजम करण्यात आले तरी सुद्धा वित्तीय वर्ष २०१९ व २०२० मधील तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या मजुरांच्या खात्यात बोनसची रक्कम जमा होण्याचे नावच घेत नसल्याने पानासोबत रक्कम उडाली की काय?अशी तेंदुपाणे गोळा करणाऱ्या मजुरांच्या मनात शंका निर्माण झाली आहे.
बोनस मिळण्याकरिता वनखात्याच्या कार्यालयात बँकेचे पासबूकची प्रत,आधार कार्ड व इतर कागदपत्रे सादर करूनही तेंदूपत्ता बोनस जमा होण्याचे नावच घेत नसल्याने कोरोना काळात तरी हातभार मिळावा अशी आशा मजूर वर्ग व्यक्त करीत आहेत.काही मजुरांच्या मते बोनसची रक्कम मिळण्याकरिता दोन-दोन वर्षे लागत असतील तर बोनस न देता सरळ मजुरी व बोनस एकत्रच देण्यात यावे असे व्यक्त केले आहे.मागील दोन वर्षातील तेंदूपत्ता बोनसची रक्कम लवकरात – लवकर जमा करण्यात यावी अशी मागणी तेंदुपाणे गोळा करणाऱ्या मजुरांकडून जोर धरू लागली आहे.