ग्रामपंचायत निवडणूकीचा वाद उफाळला बाप लेकाकडून एका इसमाचा खून

212

 

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी

भद्रावती:- नुकत्याच ४ महिन्यांपूर्वी पार पडलेल्या ग्राम पंचायतीच्या निवडणुकीचा वाद उफाळून येऊन बाप-लेकाकडून एका इसमाचा खून होण्याची घटना भद्रावती पोलिस स्टेशनअंतर्गत जेना या गावात घडली.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.११ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता जेना येथील सुरेश नामदेव परचाके (५०) यांचा बबन सीताराम परचाके (६३) व त्यांचा मुलगा शरद बबन परचाके (४३) यांच्यासोबत नुकत्याच पार पडलेल्या ग्राम पंचायतीच्या निवडणुकीवरुन वाद झाला. त्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. शरद परचाके आणि बबन परचाके या दोघा बापलेकांनी सुरेश परचाके यांना बेशुद्ध होईपर्यंत हाता-बुक्यांनी मारहाण केली. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना येथील रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मृतकाचा मुलगा वैभव याच्या तक्रारीवरुन भद्रावती पोलिसांनी बबन परचाके व शरद परचाके यांच्याविरुद्ध भा.दं.वि.३०२, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन जगताप करीत आहेत.