अण्णाभाऊंचा साहित्य प्रवास: एक दृष्टिक्षेप – लेखक – चंद्रकांत घोडगे नांदेड

0
126

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत

 

मानवी जीवनातील बऱ्यावाईट व्यवहारांचे चित्रण करणे, विश्लेषण करणे, त्यातील गुणदोष शोधून त्यावर भाष्य करणे, अशा प्रकारच्या मौखिक आणि लिखित अभीव्यक्तीस आपण ‘साहित्य’ म्हणतो.
अशा साहित्यातून तत्कालीन मानवी समाजाच्या गुण- दोषांचे, चालीरीतींचे, संस्कृतीचे, कल्पकतेचे आणि विद्रोहाचे सर्वांगीण दर्शन होत असते.यातूनच कथा, कादंबरी, कविता, नाट्य ,लोकनाट्य, लोक कथा, प्रवासवर्णन, आत्मचरित्र इत्यादी ललित साहित्य प्रकार उदयास आलेले दिसून येतात.
मुद्रण कलेच्या शोधा पासून आज पर्यंत अनेक साहित्यिकांनी आपापल्यापरीने साहित्य लिहून वाचकांचे मनोरंजन आणि प्रबोधन केले आहे. ललित साहित्य प्रकारात भारतात आज पर्यंत जेवढे काही साहित्यीक होऊन गेलेत त्यात, अण्णाभाऊ साठे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
ज्या समाजात गेल्या हजारो वर्षापासून शिक्षणाचा कसलाही गंध नव्हता त्या समाजातील केवळ दीड दिवस शाळेत गेलेले आणि कसलीही वाड•मयीन पार्श्वभूमी नसलेले अण्णा एकापेक्षा एक सरस, रंजक, रोचक व रोमांचकारी 35 कादंबऱ्या, पंधरा लघुकथा संग्रह, बारा पटकथा, मराठी पोवाडा शैलीतील दहा गाणी ,अनेक नाटके,लोकनाट्य लिहून ‘साहित्यसम्राट’ होतात हेच मुळात जगातील आठवे आश्चर्य आहे.
कमालीचे दारिद्र्य आणि भेदभावपूर्ण वातावरणामुळे ते फक्त दीड दिवस शाळेत गेले त्यानंतर त्यांची शाळा सुटली. वयाच्या अकराव्या वर्षी ते कुटुंबासह मुंबईला गेले. गिरणीत कामगार म्हणून काम करू लागले दिवसा काम करून रात्रीच्या शाळेत लिहायला- वाचायला शिकू लागले. दुकानावर च्या पाट्या वाचून ते आपले वाचन समृद्ध करू लागले.
अण्णा भाऊ साठे अभिजात प्रतिभेचे व अफाट कल्पनाशक्तीचे धनी असल्याने त्यांच्या मनातील विचार ,उर्मी ,अाशा – आकांक्षा, व्यवस्थेविरुद्धचा असंतोष बाहेर पडण्यासाठी तळमळत होता. यातूनच त्यांच्या साहित्य विश्वाला सुरुवात झाली.
दुसऱ्या महायुद्धाच्या सुमारास वर्तमानपत्रातील बातम्या वाचून व रेडिओवरील बातम्या ऐकून त्यांनी सर्वप्रथम ‘ स्टॅलिन ग्रॅड’ चा पोवाडा लिहिला. तो पोवाडा इतका प्रचंड गाजला की, थेट रशियात जाऊन पोहोचला. त्याचे 27 भाषेत रूपांतर झाले. त्यांना रशियन सरकारचे निमंत्रणही आले. त्यानंतर मात्र साहित्यविश्वात त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
‘वारणेच्या खोऱ्यात ‘ही त्यांची प्रकाशित झालेली पहिली कादंबरी. त्यानंतर एकापेक्षा एक सरस, क्रांतिकारी, भावपूर्ण, उत्कंठावर्धक कादंबऱ्या, लोकनाट्य, कथासंग्रह, नाटके, प्रवासवर्णन अण्णांनी महाराष्ट्राला दिलेल्या आहेत. अण्णांनी आपल्या या विपुल साहित्यात उपाशी राहून गावाची सेवा करणारी, कष्टाचे डोंगर उपसणारी, जीवाला जीव देणारी, व्यवस्थेचा बळी ठरलेली, अन्यायाविरुद्ध कमालीची चीड असलेली माणसे जगासमोर आणली. तसेच पोटात शिरून काळीज कुरतडणारी, खोट्या प्रतिष्ठेपायी ‘ऑनर किलिंग’ करणारी ,समाजातील लोकांच्या दुर्बलतेचा आणि लाचारीचा फायदा घेणारी, आपल्या सुखासाठी इतरांना दुःखात ढकलणारी निर्दयी माणसे व त्या माणसांनी केलेल्या क्रूर वर्तनाचे ‘कल्पनेला ही लाजवील’ असे भयंकर वास्तव अत्यंत पोटतिडकीने जगाच्या वेशीवर मांडले. त्यांनी श्रमिक, मागास व सामान्य माणसाला वाड•मयाच्या केंद्रस्थानी आणले. श्रमिकांचा हक्क जपणारा नायक व अब्रू जपण्यासाठी प्राण पणाला लावणाऱ्या नायीका त्यांनी साकारल्या. त्यांच्या माध्यमातून अनेक ‘दुर्लक्षित’ प्रश्न चव्हाट्यावर आणले. सामाजिक न्यायाचा लढा उभारला. तो अधिक प्रखर केला. त्याला नवा आयाम दिला.
‘जातीव्यवस्था आणि जातीयतेचा नाश’ व ‘समतेच्या राज्याची अपेक्षा’ही त्यांच्या लेखनाची ध्येये आहेत. ही ध्येये साध्य करण्यासाठी केवळ ‘ लेखन’ करून चालणार नाही, त्यासाठी माणसांची मने ‘निरोगी’ आणि ‘मेंदू’ सशक्त करावे लागतील, यासाठी लेखनापेक्षाही प्रभावी माध्यम ‘लोककला’ आहे, हे ओळखून 1944 साली कॉ. श्रीपाद डांगे यांच्या नेतृत्वाखाली शाहीर दत्ता गव्हाणकर व शाहीर अमर शेख यांच्या मदतीने ‘ लालबावटा ‘ नावाचे कलापथक तयार केले. पोवाडे, छक्कड, वगनाट्य, गणगौळण, लोकनाट्य यांच्या माध्यमातून ‘जनजागृती’ केली. अनेक सरकारी निर्णयांना आव्हान दिले, त्यांचा कडाडून विरोध केला, सरकारचा रोष पत्करला पण लोककला आणि लेखन सोडले नाही.
मनोरंजनातून ‘प्रबोधन ‘ आणि प्रबोधनातून ‘विचार मंथन ‘ करून अण्णांनी सर्वसामान्य माणूस ‘आतून’ पेटवला. प्रस्थापित व्यवस्थेला धडक मारण्याइतपत ‘सक्षम’ बनवला. यातूनच परिवर्तनाचा ‘आगडोंब’ उसळला. परिवर्तनासाठी लोक जीवावर उदार झाले. प्रयत्नांची पराकाष्ठा करून 1947 चाली देशाला स्वातंत्र्य मिळाले; पण अण्णांचा भ्रमनिरास झाला. लोकांच्या सामाजिक परिस्थितीत या स्वातंत्र्यामुळे काडीचाही फरक न झाल्यामुळे स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईत भर पावसात वीस हजार लोकांचा मोर्चा काढला.’ ये आझादी झुठी है, देश कि जनता भुकी है’ ही घोषणा त्या मोर्चात निनादत होती व भर पावसातही भल्याभल्यांना घाम फोडत होती. तथाकथित स्वातंत्र्याची चिरफाड करीत होती.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सामान्य माणसाच्या सामाजिक जीवनात ‘अमुलाग्र’ बदल घडून येईल असा भोळा आशावाद घेऊन जगणार्‍या अण्णाच्या संवेदनशील मनाला सर्वसामान्यांची ‘जैसे थे’ परिस्थिती सहन झाली नाही. या गोष्टीस कारणीभूत असलेल्या ‘उन्मत व सत्ताधुंद’ गुन्हेगारांना त्यांनी पेनाच्या शाईने फटकारले. त्यांना सामाजिक न्यायालयाच्या कटघ-यात उभे केले. त्यांच्या पुरोगामित्वाचा व ढोंगीपणाचा बुरखा टराटरा फाडला. त्यांचा खरा चेहरा उघड केला. यासाठी त्यांनी फकीरा ,सत्तू, हिंदुराव, चित्रा, गुना, मास्तर, चंद्रा, मूर्ती, खाशाबा, पंत, पाटील, रानोजी, आवडी, रुकसाना, साधू अशा अनेक नायक-नायिका जगासमोर मांडल्या. प्रभावीपणे त्यांची पात्र रंगविली. त्यांनी रंगवलेली ही पात्र वाचताना माणसाचं मन उचंबळून येतं, कधी गर्भगळीत होतं, कधी अंगावर शहारे येतात, कधी चीड येते, मन अस्वस्थ होतं, कधी बेभान होतं ,कधी लाजतं, कधी मुरडत, कधी बहरून येतं, कधी विषन्न होतं, कधी आनंदून जातं, अभिमानाने फुलून जातं, तर कधी आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करतं.
ही ताकद अण्णाभाऊंच्या लेखणीची आहे. त्यांनी आपल्या कल्पकतेला वास्तवतेची जोड दिल्यामुळे क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारं, वाचकांना खिळवून ठेवणारं अन थेट हृदयाला भिडणारं हे साहित्य माणूस ‘ बेभान ‘ होऊन वाचतो. ती भूमिका तो जगतो, त्या भूमिकेतून बाहेर पडणे, माणसाला कठीण होऊन जाते. म्हणूनच अण्णांना लाखोंचा वाचकवर्ग लाभला. लोक त्यांच्या कादंबरीची /पुस्तकांची वाटच पाहायचे.1961 साली त्यांच्या ‘फकीरा ‘ या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा ‘उत्कृष्ट कादंबरी’ हा पुरस्कार मिळाला तर रशियन सरकारने सुद्धा त्यांना प्रत्यक्ष बोलावून त्यांचा जंगी सत्कार केला आहे.
त्यांच्या कादंबऱ्यांवर आधारित ‘वैजयंता’, ‘डोंगरची मैना, ‘टिळा लाविते मी रक्ताचा,’ ‘अशी ही कोल्हापूरची तऱ्हा’, ‘मुरली मल्हारी रायाची’ ‘फकीरा’ , ‘वारणेचा वाघ’असे एकापेक्षा एक जबरदस्त आणि सुपरहिट चित्रपट तयार झालीत.
‘जग बदल घालुनी घाव ‘ व ‘माझी मैना गावाकडे राहिली’ या दोन गीतांनी अण्णाभाऊंची साहित्यिक उंची वाढवली .त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन बसवले.
लोकप्रियतेच्या शिखरावर चढणारे अण्णा दुर्दैवाने पैशाच्या बाबतीत मात्र फार मागे राहिले. त्यांनी भावी परिस्थितीचा विचार करून थोडी व्यावसायिकता दाखविली असती तर दौलत त्यांच्या घराकडे ‘गंगेसारखी’ धावत आली असती. पण अण्णांना हे जमले नाही. त्यांचे बहुमूल्य साहित्य कवडीमोल भावाने विकत घेऊन तत्कालीन प्रकाशक आणि दिग्दर्शक ‘मालामाल’ झाले. पण अण्णाभाऊंच्या वाट्याला मात्र हलाखीचे, उपेक्षितांचे व दारिद्र्याचे जीवन आले. आज आपण त्यांची जन्मशताब्दी साजरी करत असताना सुद्धा त्यांच्या वारसांच्या आर्थिक परिस्थितीत काहीही फरक पडलेला आपणास दिसत नाही. अण्णाभाऊंच्या नावे आपली ‘ पोट’ भरणारी मंडळीसुद्धा त्यांच्या कुटुंबाकडे ‘अक्षम्य’ दुर्लक्ष करताना दिसतात.
असे असले तरीही त्यांनी लिहिलेल्या साहित्यामुळे, त्यातील चित्तवेधक प्रसंगामुळे, रंगविलेल्या पात्रामुळे, गाजवलेल्या सभा संमेलनामुळे, कला पथकातील भारदस्त पहाडी आवाज व धारदार शब्दांमुळे प्रेक्षकांच्या व वाचकांच्या मनावर ते नेहमीच ‘अधिराज्य’ करत आले आहेत.
‘साहित्यरत्न’ ,’साहित्यसम्राट’, ‘लोकशाहीर’ या मानाच्या पदव्यांनी आजही अण्णाभाऊंची व महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावते आहे. लोक पिढ्यानुपिढ्या अण्णाभाऊच्या साहित्यांचे पारायण करतील व त्यांचे गुणगान गात राहतील,यात काही शंका नाही.
मा. चंद्रकांत घोडगे
नांदेड
9423657467