स्टेटस ठेवून त्याने नदीत मारली उडी, तरुणाच्या आत्महत्येने उडाली खळबळ !

204

 

विभागीय प्रतिनिधी//हर्षे साखरे

मोबाईलमधील व्हॉट्सअ‌ॅपवर व्हिडिओ स्टेटस ठेवून एका तरुणाने नदी पात्रात उडी घेत आत्महत्या केल्याची घटना कल्याण-पडघा मार्गावरील गांधारी पुलाजवळ घडली. मयूर जाधव (वय २०) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

मयूर हा कल्याण पश्चिम परिसरातील बारावे या गावात कुटुंबासह राहात होता. आज सकाळपासूनच तो दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात आले.

खळबळजनक बाब म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी मयूरने आपल्या मोबाईलवर एक व्हिडिओ तयार केला.

या व्हिडिओमध्ये दारू ही माणसाच्या जीवनातील सगळ्यात बेकार गोष्ट असल्याचे त्याने नमूद केले. पुढे त्याने या व्हिडिओ स्टेटसमध्ये म्हटले की, काही गोष्टी अशा घडल्या की, आता समोर काहीच रस्ता दिसत नाही.

माझी आठवण जेव्हा काढाल तेव्हा हसून आठवण काढा, तुमच्या जीवनातील असा जोकर होता तो, आतून तुटलेला, मात्र तुम्हाला हसवत राहिला, असे म्हणत त्याने गांधारी पुलावरून नदीपात्रात उडी घेतली.

मोबाईलवरील व्हिडिओ स्टेटसमुळे ही घटना समोर येताच खडकपाडा व पडघा या दोन्ही पोलीस ठाण्यांच्या पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत अग्निशामक दलाच्या मदतीने मयूरच्या मृतदेहाचा शोध सुरू केला आहे. मात्र त्याने आत्महत्या करणाऱ्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले? याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.