आनंदाची बातमी : कोरोना उपचारासाठी खर्च केलेले पैसे परत मिळणार !

266

 

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी नागपूर

मुंबई:- उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य शासनाला महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील रुग्णालयांनी रुग्णांकडून आकारलेली रक्कम परत करण्याविषयी काय कार्यवाही केली याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

या शिवाय संबंधित रुग्णालयावर काय कारवाई केली, याचा अहवाल ही न्यायालयात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, त्यामुळे योजनेचा लाभ घेणाऱ्या रुग्णांना या निर्णयाचा लाभ होईल. खंडपीठाने या योजनेअंतर्गत रुग्णांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

बिल परत मिळणार
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महात्मा फुले जन आरोग्य योजनेबाबत निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे या योजनेतील कोरोना उपचाराची बिले नागरिकांना परत मिळण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहेत. कोरोनावरील उपचार घेतलेल्या रुग्णांकडून ज्या खासगी रुग्णालयांनी बिले आकारली ती परत मिळण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.

समिती स्थापन
योजनेत समाविष्ट असणाऱ्या काही रुग्णालयांकडून रुग्णांकडून रक्कम घेतली जात असल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी याचिका दाखल केली होती. रुग्णांना नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करण्याचे आवाहन
रुग्णांनी ज्या खासगी रुग्णालयात उपचार घेतला त्या रुग्णालयाचे बील, मेडिकलच्या पावत्या, रुग्णांचे आधार कार्ड ,रेशन कार्ड, झेरॉक्स प्रत जोडून जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावेत, असं आवाहन करण्यात आले आहे.