आरमोरी तालुक्याला रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांची निवेदनातून मागणी

44

 

अश्विन बोदेले
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत

 

आरमोरी :- जिल्ह्यासह आरमोरी तालुक्यातील दुर्गम व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरू असून, गावोगावी बाधित निघत आहेत. संख्या वाढल्याने काही रुग्णांना इतरत्र हलवावे लागत आहे. परंतु रुग्णांची ने-आ करण्यासाठी येथे रुग्णवाहिका नाही. त्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांना मानसिक, शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मदत व पुनर्वसन निधीतून आरमोरी उपजिल्हा रुणालय, जोगीसाखरा ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र देलनवाडी येथे रुग्णवाहिका उपलब्ध करून द्या, अशी मागणी गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेसचे सचिव दिलीप घोडाम यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे. आरमोरी तालुका लोकसंखेत सर्वांत मोठा असून, सभोवताल अनेक गावे आहेत. मात्र त्या ठिकाणी पाहिजे त्या आरोग्याच्या सुविधा नाहीत. त्यामुळे रुग्णांना ग्रामीण भागातून विनाप्राणवायू असलेल्या खाजगी वाहनांनी जीव धोक्यात घालून आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणावे लागते. गेल्या वर्षीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र सुरू आहे. यंदाही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात आहे. रुग्णांना गडचिरोली किंवा इतर कोविड केंद्रांमध्ये हलवावे लागते. त्यासाठी वेळेवर रुग्णवाहिका मिळणे आवश्यक आहे. मात्र आरमोरी तालुक्यात बोटावर मोजण्याइतक्याच रुग्णवाहिका आहेत. असलेल्या रुग्णवाहिका प्रसूतीच्या रुग्णांच्या
सेवेत असल्याने कोरोनाबाधितांना वेळेवर उपलब्ध होत नाहीत. दुर्गम भागातील अनेक रुग्णांचा
रुग्णवाहिकेअभावी वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालय आरमोर ग्रामपंचायत जोगीसाखरा व प्राथमिक आरोग्य केंद्र देलनवाडी येथे मदत व पुनर्वसन निधीतून रुग्णवाहिका उपलब्ध करून द्या, अशी मागणी दिलीप घोडाम यांनी ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे. आरमोरी तालुक्याला रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासन दिलीप घोडाम यांना दिले.