बळीराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत… जिल्हाभरात १८ टक्के पावसाची पडली तूट… पावसाची, तुट वाढल्यास धान पीक धोक्यात येण्याची शक्यता…

0
100

 

प्रितम देवाजी जनबंधु
कार्यकारी संपादक

गडचिरोली : २६ जुलैपर्यंत जिल्ह्यात पडणाऱ्या अपेक्षित पावसाच्या तुलनेत १८ टक्के पाऊस कमी पडला आहे. धानोरा, कोरची, गडचिरोली, कुरखेडा या तालुक्यांमध्ये पावसाची तूट अधिक असल्याचे दिसून येते. गडचिरोली जिल्ह्यात वर्षभरात सरासरी १२५४ मिमी पाऊस पडते. १ जूनपासून प्रशासनामार्फत पावसाची नोंद घेण्यास सुरूवात होते. यावर्षी अगदी वेळेवर पाऊस पडला. तसेच पहिला पाऊस पडल्यानंतर काही दिवस उसंत दिल्याने पेरणीची कामे नियोजितवेळी आटोपली. पेरणीची कामे संपल्यानंतर धान रोवणीच्या कामाला सुरूवात झाली आहे.

धान रोवणीसाठी मोठ्या प्रमाणात पावसाची गरज भासत असल्याने शेतकरी जुलै महिन्यापासून मोठ्या पावसाची अपेक्षा करते. मात्र यावर्षी जुलै महिन्यात फारसा पाऊस झाला नाही. अजुनही काही परिसरात पुरेसा पाऊस झाला नसल्याने धान रोवणीची कामे खोळंबली आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. अशाच शेतकऱ्यांची धान रोवणी सुरू आहेत.

जून महिन्यात २१०.९ मिमी अपेक्षित पाऊस होता. प्रत्यक्षात यावर्षी १९५ मिमी पाऊस पडला आहे. अपेक्षित पावसाच्या तुलनेत यावर्षी प्रत्यक्ष पडलेल्या पावसाची टक्केवारी ९२.४ टक्के एवढी आहे. १ ते २६ जुलै या कालावधीत ३५८.९ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र केवळ २७१.८ मिमी पाऊस पडला आहे. जुलै महिन्यात अपेक्षित पावसाच्या ७५.६० टक्केच पाऊस झाला आहे. १ जून ते २६ जुलैपर्यंत ५६९.८ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ४६६.७ टक्के पाऊस झाला आहे. अपेक्षित पावसाच्या १८ टक्के कमी प्रमाणात पाऊस पडला असल्याची नोंद झाली आहे.

काही तालुक्यांमध्ये ६० टक्केपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. तर काही तालुक्यांमध्ये मात्र १०० टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. कमी पाऊस झालेल्यांमध्ये गडचिरोली तालुक्यात अपेक्षित पावसाच्या ६३.७ टक्के, कुरखेडा ६७.६, आरमोरी ७४.१, एटापल्ली ७८, धानोरा ४८.८, कोरची ४८, देसाईगंज तालुक्यात ६७.७ टक्के पाऊस पडला आहे. सिरोंचा ११८ टक्के, मुलचेरा तालुक्यात ११२ व भामरागड तालुक्यात १०४ टक्के पाऊस पडला आहे.

कापूस, सोयाबिन, तूर, तीळ या पिकांना कमी प्रमाणात पावसाची गरज भासते. यावर्षी तुटक प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे ही पिके जोरात सुरू आहे. काही भागातील शेतकरी निंदणाची कामे करीत आहेत. मागील वर्षी सातत्त्याने पाऊस पडल्याने कापूस, सोयाबिन पिकांच्या उत्पादनात घट झाली होती. यावर्षी मात्र ही पिके चांगली आहेत. दुसरीकडे जुलै महिना संपण्याच्या मार्गावर असतानाही अजुनपर्यंत तलाव, बोड्या भरल्या नाहीत. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. काही शेतकरी तर तलावात साचलेले पाणी सोडून रोवणीची कामे करीत आहेत. पावसाची, तुट वाढल्यास धान पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे.