तालुकास्तरावरही कोवीडसाठी उपाययोजना करा युवक काँग्रेसची राज्य शासनाकडे मागणी…..

76

 

प्रितम देवाजी जनबंधु
कार्यकारी संपादक

गडचिरोली :- जिल्ह्यात सर्वच तालुक्यात कोवीड संदर्भात उपाययोजना करणे सुरू करण्यात आले असले तरी वाढती रूग्ण संख्या लक्षात घेता ती तोकडी पडत आहे. अनेक ठिकाणी ऑक्सीजन बेडची कमतरता तर काही ठिकाणी व्हेंटीलेटरचा अभाव असल्यामुळे सर्वच तालुक्यातील रूग्ण जिल्हा मुख्यालयात येत आहेत. यामुळे भविष्यात जिल्हा मुख्यालयातील रूग्णालयांची स्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुका स्तरावर सर्वसोयीयुक्त कोवीड नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

जिल्ह्यात काही ठिकाणी ऑक्सीजनसह व्हेंटीलेटरचे बेड उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र, त्या ठिकाणी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी सर्व यंत्र सामुग्री धूळखात पडून आहे. बेड उपलब्ध असतानाही सेवारत अधिकाऱ्यांसमोर तज्ज्ञ अधिकाऱ्यांची समस्या निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सुविधा उपलब्ध असून सुद्धा रूग्णांना सेवा देता येऊ शकत नाही. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात किमान १०० खाटाचे सर्वसोयीयुक्त कोवीड रूग्णालय सुरू करून तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांचीस नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणीही युवक काँग्रेसने केली आहे.

जिल्हा मुख्यालयात येणाऱ्या रूग्णांची संख्या लक्षात घेता, दररोज अनेक रूग्ण येथे उपचारासाठी दाखल होतात. येथे येऊन सुद्धा तासंतास त्यांना बेडसाठी प्रतीक्षा करावी लागते. त्यानंतरही बेड उपलब्ध होऊन उपचार सुरू होती. ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सुदैवाने अजूनपर्यंत येथे प्रतीक्षेत असलेल्या रूग्णाला धोका झाला नाही. अशीच परिस्थिती कायम राहल्यास भविष्यात येथे उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांच्या रांगा लागण्याची शक्यता आहे. येथील होणारी गर्दी व रूग्णावर वेळेत उपचार होण्याकरिता स्थानिक पातळीवर (तालुकास्तरावर) १०० खाटांचे सर्वसोयीयुक्त कोवीड रूग्णालय सुरू झाल्यास जिल्हावासीयांना मोठी मदत होणार आहे, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

जिल्ह्यात कुठेही मोठे खासगी रूग्णालय नाहीत. त्यामुळे जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातील रूग्णांची भीस्त ही शासकीय रूग्णालयांवरच आहे. यातच सर्वच तालुक्यातून रूग्ण जिल्हा मुख्यालयात येत आहेत. तालुका मुख्यालय व जिल्हा मुख्यालयाचे अंतर मोठे आहे. सिरोंचा, कोरची, कुरखेडा, अहेरी, भामरागड, एटापल्ली, चामोर्शी, धानोरा, आरमोरी, मूलचेरा या सर्व 11 तालुक्यातील रूग्ण गडचिरोली येथे आणण्याकरिता किमान दोन ते चार तास वेळ लागते. ही कालावधी लक्षात घेऊन तालुका मुख्यालयात रूग्णालय सुरू करण्यात यावे, अशीही मागणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केली आहे.